ॲंकर
NSK26H33435
जळगाव : पुणे येथे रवींद्र दामले पुरस्कार स्वीकारताना परिवर्तनच्या महिला कलावंत. (डावीकडून) नेहा पवार, हर्षदा कोल्हटकर, सोनाली पाटील, माधुरी बर्वे, सुनील शानबाग, अंजली धुमाळ, चंद्रकांत काळे, मोहन आगाशे, रेखा बाविस्कर, प्रतीक्षा कल्पराज, रजिता राजेशिर्के आणि शंभू पाटील.
परिवर्तन संस्थेला ‘रवींद्र दामले पुरस्कार’ प्रदान
पुण्यात रंगकर्मी चंद्रकांत काळे, मोहन आगाशे यांच्या हस्ते सन्मान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२४ : महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीवर सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या नाट्यसंस्थेला महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘रवींद्र दामले पुरस्कार’ यंदा जळगावच्या परिवर्तन संस्थेला प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध रंगकर्मी चंद्रकांत काळे आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिवर्तनच्या वतीने संस्थेतील महिला कलावंतांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुण्यातील श्रीराम लागू रंगमंच ‘अवकाश’ या नाट्यगृहात आयोजित समारंभात पुरस्कार वितरण झाले. परिवर्तनच्या रेखा बाविस्कर, सोनाली पाटील, माधुरी बर्वे, अंजली धुमाळ, रजिता राजेश शिर्के, हर्षदा कोल्हटकर, प्रतीक्षा कल्पराज आणि नेहा पवार यांनी हा सन्मान स्वीकारला.
प्रायोगिक रंगभूमीवर योगदान
परिवर्तन संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना चंद्रकांत काळे यांनी, शंभू पाटील आणि त्यांची परिवर्तन संस्था हे रंगभूमीवरील आशादायी चित्र असल्याचे सांगितले. प्रायोगिक रंगभूमी पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण काम परिवर्तन करत असल्याचे नमूद करत त्यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
सहकार्याप्रती कृतज्ञता
पुरस्कार स्वीकारल्यानंतर शंभू पाटील यांनी नाटक आणि नाट्यसंस्थेचे काम हे एकट्या-दुकट्याचे नसून, त्यासाठी अनेकांचे सहकार्य आवश्यक असते, अशी भावना व्यक्त केली. परिवर्तनच्या प्रवासात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, अशोक जैन व जैन उद्योग समूह, श्रीकांत देशमुख, नंदू माधव, संदीप मेहता, विजय बाविस्कर, नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, हर्षल पाटील यांच्यासह अनेक सहकाऱ्यांचा उल्लेख करून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
चौकट
ज्येष्ठ रंगकर्मींनाही पुरस्कार
या समारंभात रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि महत्त्वाचे रंगकर्मी सुनील शानबाग यांना ‘अधिष्ठाता पुरस्कार’, तर अनुष्का आपटे यांना ‘सई भागवत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरणानंतर यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या ‘दगडी भिंत’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या वेळी नाट्यसृष्टीतील अतुल पेठे, अनिरुद्ध खुटवड, विजय बाविस्कर, समर नखाते, आशुतोष पोतदार, शिरीष बर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.