RDSS Yojana : सिन्नरमधील 145 गावांना मिळणार 24 तास थ्री फेज वीज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RDSS Yojana

RDSS Yojana : सिन्नरमधील 145 गावांना मिळणार 24 तास थ्री फेज वीज!

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर विधानसभा मतदारसंघातील १४५ गावांतील शेतशिवारात घरगुती व व्यावसायिक वापरासाठी सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेंतर्गत २४ तास थ्री फेज वीज मिळणार असून, त्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ७० कोटी रुपयांतून हे काम दोन वर्षांच्या आत पूर्ण होणार आहे. (RDSS Yojana 145 villages in Sinner will get 24 hours three phase electricity nashik news)

सिन्नर विधानसभा मतदारसंघात गावांमध्ये सिंगल फेज योजना आहे, तथापि, शिवारातील अनेक वाडी-वस्त्यांवर ही योजना नाही. शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यालाही घरगुती वापराची अखंडीत वीज मिळाली पाहिजे यासाठी केंद्र व राज्यसरकारच्या प्रत्येकी ५० टक्के निधीतून सुधारित वितरण क्षेत्र(आरडीएसएस) योजना राबविण्यात येते.

त्यातून सिन्नर विधानसभा मतदारसंघात हे काम होण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ऊर्जा विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यातून हे काम मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच ते सुरू होणार आहे.

सिन्नर विधानसभा मतदारसंघात आरडीएसएस योजनेचा आराखडा बनवितांना गावठाणासोबतच वाड्या-वस्त्यांचाही त्यात समावेश करण्याची सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी सप्टेंबर २०२२ रोजी अधीक्षक अभियंता पडळकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत केल्या होत्या, त्यानुसार या आराखड्यात घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना २४ तास थ्री फेज वीज उपलब्ध करण्याचा समावेश करण्यात आला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

त्यासाठी नव्याने ५४ फीडर, २९४ रोहित्रे, जुन्या फीडरवर ६९ एचडीटी बसविण्यात येणार आहे. शिवारात ११ केव्हीची वाहिनी फिरणार असून तेथून नवीन २९४ रोहीत्राना वीजपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर एबी केबल द्वारे ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे वीजचोरी होणार नाही.विशेष म्हणजे ही वीज थ्री फेज स्वरूपात २४ तास उपलब्ध राहणार आहे.

"केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त तरतुदीतून राबविण्यात येणाऱ्या आरडीसएस योजनेचा आराखडा बनवतांना त्यात गावठाणासोबतच वाड्या-वस्त्यांचा त्यात समावेश करण्याची मागणी केली. ही योजना पूर्ण झाल्यावर वाड्या-वस्त्यांवरही २४ तास थ्री फेज वीज उपलब्ध राहणार आहे. त्यातून शेतीवर आधारित पूरक उद्योग सुरू होवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल." - माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर