esakal | तीन दिवसांत मिळाले अवघे सात हजार रेमडेसिव्‍हिर; चिंतेत भर
sakal

बोलून बातमी शोधा

remdesevir

तीन दिवसांत मिळाले अवघे सात हजार रेमडेसिव्‍हिर; चिंतेत भर

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : रेमडेसिव्‍हिरच्‍या तुटवड्याचा प्रश्‍न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला असून, गेल्‍या तीन दिवसांत जिल्ह्याला रेमडेसिव्‍हिरचे अवघे सात हजार व्‍हायल (इंजेक्‍शन) प्राप्त झाले आहेत. यांपैकी एक हजार इंजेक्‍शन नंदुरबारला पाठविली आहेत. त्‍यामुळे जिल्ह्यातील रुग्‍णांकरिता अवघे सहा हजार व्‍हायल उपयोगात आले. या पार्श्‍वभूमीवर आता रुग्‍णालयांसह जिल्‍हा प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

रुग्‍णालय, जिल्‍हा प्रशासनाच्या चिंतेत भर

जिल्ह्यात रोज सरासरी चार हजार कोरोनाबाधित आढळत असून, अत्यवस्‍थ रुग्‍णांच्या संख्येतही वाढ होते आहे. अनेक रुग्‍णांना वेळीच रुग्‍णालयांमध्ये खाटा उपलब्‍ध होत नसल्‍याने त्‍यांची प्रकृती खालावत आहे. अशात उपचारासाठी रेमडेसिव्‍हिरची आवश्‍यकता भासू लागली. शासनाने या संदर्भात दिशानिर्देश जारी केले असले, तरी त्‍यानुसार पात्र रुग्‍णांनाही इंजेक्‍शन उपलब्‍ध होतात की नाही, अशी स्‍थिती सध्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या ४० हजारांच्‍या उंबरठ्यावर आहे. रेमडेसिव्‍हिरचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्‍हा प्रशासनामार्फत थेट कोविड रुग्‍णालयांना इंजेक्‍शनचा पुरवठा केला जातो आहे; परंतु मागणीच्‍या तुलनेत पुरवठाच होत नसल्‍याने रुग्‍णालयांना इंजेक्‍शन उपलब्‍ध करणे आव्‍हानात्‍मक ठरू लागले आहे.

जादा पैसे देऊन इंजेक्‍शन खरेदीचा प्रयत्‍न पुन्‍हा सुरू

नाशिककरांसाठी बेंगळुरू येथून सात हजार रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन प्राप्त झाली होती. यापैकी एक हजार इंजेक्शन नंदुरबारला रवाना करण्यात आली. आधीच तुटवडा जाणवत असताना जिल्ह्यातील कोट्याचे इंजेक्‍शन अद्याप प्राप्त न झाल्‍याने प्रशासकीय यंत्रणेची चिंता वाढली आहे. दुसरीकडे बाहेर उपलब्‍धता होत नसतानाही प्रसंगी रुग्‍णाच्‍या नातेवाइकांना जादा पैसे देऊन इंजेक्‍शन खरेदीचा प्रयत्‍न पुन्‍हा सुरू झाला आहे. यामुळे पुन्‍हा एकदा इंजेक्‍शनचा काळा बाजार होण्याची भीती व्‍यक्‍त होते आहे.