फोटो : H35196
नाशिक : संदीप तंत्रनिकेतन येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर.
---
प्रादेशिक भाषांमधून तंत्रज्ञान शिक्षण महत्त्वाचे
डॉ. संदीप झा : संदीप तंत्रनिकेतनमध्ये अटल शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : नूतन शिक्षण प्रणाली व महाविद्यालय-उद्योग सहकार्य हे नवीन आयाम धारण करीत आहे. उद्योग संस्थांना, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाविद्यालयांनी पार पाडावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील भाषेचा न्यूनगंड दूर होण्यासाठी प्रादेशिक भाषांमधून तंत्रज्ञान शिक्षण-प्रशिक्षण विकसित करण्यासाठी महाविद्यालयांनी शासनाच्या योजनांना पाठबळ द्यावे, असे प्रतिपादन संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी केले.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद प्रशिक्षण व शिक्षण ऍकॅडमी (अटल) प्रायोजित तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य पंकज धर्माधिकारी, स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश बुराडे, विभागप्रमुख प्रा. भूषण विसपुते उपस्थित होते. डॉ. झा म्हणाले, की ग्रामीण व दूरस्थ भागातील हुशार विद्यार्थी केवळ भाषेच्या न्यूनगंडामुळे तंत्रशिक्षणाच्या प्रवाहापासून दूर रहातो. प्रादेशिक भाषांमधून तंत्रशिक्षणामुळे तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. अधिष्ठाता डॉ. बुराडे यांनी प्रादेशिक भाषेतील प्रशिक्षणाची गरज विषद केली. तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने प्रायोजित केला. या कार्यक्रमात विविध तंत्र शिक्षण व अभियांत्रिकी शिक्षकांना प्रादेशिक भाषेत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान कसे द्यावे तसेच प्रादेशिक भाषांचा उपयोग शिक्षणात कशा पद्धतीने करावा याचे प्रशिक्षण दिले जाते आहे. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी संस्थांमधील ९० शिक्षक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.