दोन लाखांवर शेतकऱ्यांची
रेणुका कृषी प्रदर्शनाला भेट
चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या ‘रेणुका कृषी प्रदर्शन २०२६’ला शेतकरी, उद्योजक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाच दिवसांच्या कालावधीत दोन लाखांहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. २९ ऑक्टोबरला अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीप बनकर, आमदार गोकुळ गिते, पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपरे यांच्या हस्ते आमदार शिरीषकुमार कोतवाल, जयदेवपुरी महाराज आदीच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हंगामी व्यवस्थापन, कांदा व्यवस्थापन, डाळिंब लागवड, भाजीपाला व्यवस्थापन आणि हवामानविषयक मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळाली. ''शेतकरी ते उद्योजक : समृद्धीचा नवा प्रवास'' या संकल्पनेअंतर्गत कौशल्य विकास, स्वयंरोजगार, गाव तिथे उद्योजक आणि शासकीय अनुदान योजनांची माहिती देण्यात आली. प्रदर्शनानिमित्त झालेल्या शिबिरात २९० जणांनी रक्तदान केले. माजी मंत्री डॉ. भारती पवार, आमदार संजय पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट शेतकरी, उत्कृष्ट महिला शेतकरी, उत्कृष्ट बचत गट, महिला शेतकरी बचत गट, उत्कृष्ट उद्योजक आणि उत्कृष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ''रेणुका कृषिभूषण पुरस्कार २०२६'' देऊन गौरविण्यात आले.