Nashik Crime News: शहरात कत्तलीसाठी येणाऱ्या जनावरांची सुटका; 2 बोलेरोसह साडेचार लाखाचा ऐवज जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News: शहरात कत्तलीसाठी येणाऱ्या जनावरांची सुटका; 2 बोलेरोसह साडेचार लाखाचा ऐवज जप्त

मालेगाव (जि. नाशिक) : मनमाड-मालेगाव रस्त्यावरील कौळाणे व मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंगसे शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तालुका पोलिसांनी सापळा रचून शहरात कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक करून आणण्यात येत असलेले १४ गोवंश जप्त केले.

बेकायदा विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोन बोलेरो वाहनांसह गोवंश असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्याने ही कारवाई केली. (Rescue of animals coming for slaughter in city 2 boleros along with four and half lakhs seized Nashik Crime News)

गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, भुरा सूर्यवंशी, विलास जगताप यांना कत्तलीसाठी जनावरे आणण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिली.

पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. पाटील यांच्या आदेशानुसार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई संजय देशमुख, उमेश पाटील, पवार, हिरे यांनी कौळाणे शिवारात सापळा रचला. पहाटे अडीचच्या सुमारास त्यांना बोलेरो पिकअप (एमएच ४१ एजी ११३५) भरधाव वेगाने येताना दिसली.

पोलिसांनी चालकाला हात दाखवून वाहन थांबण्याचा इशारा केला. चालकाने चालू वाहनातून उडी मारत पिकअप सोडून दिल्याने ती रस्त्यालगत उलटली. अंधाराचा फायदा घेत चालक फरार झाला. पोलिसांना या पिकअपमध्ये सात गोवंश मिळून आले.

हेही वाचा: Nashik Crime News : लासलगावी तरुणाचे अपहरण, मारहाण; तिघांना अटक, एकजण फरारी

महामार्गावरील मुंगसे शिवारात याच पद्धतीने सापळा रचून तालुका पोलिसांनी बोलेरो पिकअप (एमएच ४३ एडी १३३७) अडविण्याचा प्रयत्न केला. संबंधित चालकाने रस्त्यावरील गतिरोधकावर वाहन चढवत पलटी केले.

चालकाच्या साथीदाराला विचारपूस केली असता ही जनावरे शहरात कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. या पिकअपमध्ये सात गोवंश निर्दयतेने पाय, तोंड दोरीने घट्ट बांधून कोंबलेल्या व जखमी अवस्थेत मिळून आल्या.

कारवाईत ५९ हजाराचे गोवंश जनावरे पावणेदोन लाखाची पिकअप असा दोन लाख ३४ हजाराचा तर मुंगसे येथील ७४ हजाराचे गोवंश व दीड लाखाची बोलेरो पिकअप असा दोन लाख २४ हजार तर एकूण ४ लाख ५८ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी कलीम बाबू कुरेशी (गुलशन नगर) व मुश्रीफ साबीर खान (सवंदगावशिवार) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : दुचाकी अट्टल चोरटा अटकेत