येवला- कधी तीन, कधी चार, तर कधी पाच दिवसांआड पाणीपुरवठा शहरासाठी नित्याचाच झाला आहे. यावर पर्याय चर्चेत येतात; पण उपाययोजनेच्या नावाने शंखोबा आहे. विशेष म्हणजे, शहरासाठी ९७ एकराचा साठवण तलाव तयार झाला. .त्यात पिण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून घेतलेले पाणी सुमारे १२० दिवस पुरायला हवे. ते तलावातून होणारी गळती आणि बाष्पीभवनामुळे ५५ दिवसांच्या आसपासच पुरते. त्यातच तलावाच्या आजूबाजूला विहिरीचा सपाटा सुरू असून, त्यातून वारेमाप उपसा होतो. मात्र, गळती आणि पाणी उपशावर कोणी बोलायला व तलावाच्या अस्तरीकरणासाठी पुढाकार घ्यायला तयार नसल्याने शहरावरची टंचाईची साडेसाती वर्षानुवर्षे ‘जैसे थे’च आहे..टप्पा क्र. दोनच्या योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठ्यासाठी जुन्या गंगासागर तलावाशेजारी ९७ एकरांचा तलाव करण्यात आला आहे. या योजनेमुळे शहराला रोजचा पाणीपुरवठा नशिबी येईल असे वाटले होते पण तसे झालेले नाही. या साठवण तलावातून प्रचंड प्रमाणात गळती होऊन हे पाणी आजूबाजूला बड्याच्या विहिरीत जाते. .पूर्वी ही संख्या १०८ होती, मात्र आज २०० वर विहिरी झाल्या असून काहींनी येथून १० ते १५ किलोमीटरपर्यंत पाईपलाईन करून शेतीसाठी पाणी नेले आहे. गळतीमुळे तलावाचा झपाट्याने उपसा होऊन संक्रात मात्र शहरवासियांवर येत आहे. गळती थांबविण्यासाठी कुठलेच प्रयत्न केले गेले नाहीत. परिणामी पिण्यासाठी घेतलेले पाणी शेतीला उपयुक्त ठरते अन् पालिका व नागरिकांचे लाखो रुपये ‘पाण्यात'' जातात..जाणकारांच्या माहितीनुसार पालखेड कालव्यातून तलावात १२० दिवसांसाठी घेतलेले पाणी ५० ते ५५ दिवस पुरते. किंबहुना तीन दिवसांचे पाणी एकच दिवस पुरते. साधारणतः २० ते २२ दशलक्ष घनफूट पाणीगळती होते अन् १० ते १२ दशलक्ष घनफूट पाणी उपयोगात येत असल्याचा अंदाज आहे. .पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनाने तलावात ५० द.ल.घन फूट क्षमतेच्या साठवण तलावात संपूर्ण क्षमतेने भरून दिला तरीही पालिका शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करू शकत नाही. पालिकेची पाणी वितरण व्यवस्था लाखो रुपये खर्च करूनही सक्षम झाली नाही. पालखेड प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे दोन्ही साठवण तलावात पुरेसा पाणीसाठा देखील अनेकदा मिळत नसल्याचा अनुभव आहे. साठवण तलावात पाणी मुबलक असूनही उपयोग नाही. शहरवासीयांना दररोज पाणी मिळावे, यासाठी पाणी वितरण व्यवस्थेत संपूर्ण शहरात समांतर पाईप लाईन टाकावी लागेल. शिवाय पाणी उपलब्धता वाढवावी लागणार आहे..पाणीपट्टी वर्षाची, पाणी मात्र ९० दिवस!पालिका नागरिकांकडून वर्षाला प्रत्येक मालमत्ताधारकांकडून एक हजार २०० रुपये पाणीपट्टी आकारणी करते, या हिशेबाने पालिकेला दोन कोटी ६७ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल होते. यातून पाण्याच्या बदल्यात पालखेड विभागाला लाखो रुपये पालिकेला द्यावे लागतात. मात्र, या विकत घेतलेल्या पाण्याची जबाबदारी आतापर्यंत पालिकेने उचलली नाही, म्हणूनच ६० टक्क्यांच्या आसपास पाण्याचा अपव्यय सुरू आहे. विशेष म्हणजे, वर्षातील ३६८ दिवसांपैकी साधारणतः ९० ते ९५ दिवसच पाणीपुरवठा शहरवासीयांना होतो. मग वर्षासाठी पाणीपट्टी कोणत्या न्यायाने आकारली जाते, हाही नागरिकांना प्रश्नच आहे..तलावाचे काँक्रिटीकरण का नाही?पालखेड विभागाला लाखो रुपये देऊन घेतलेल्या पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असेल तर या ९७ एकराच्या तलावाचे काँक्रिटीकरण किंवा प्लॅस्टिक अस्तरीकरण का होत नाही, हा सर्वसामान्य येवलेकरांना पडलेला प्रश्न आहे. विकासाचे निर्णय घेणाऱ्यांना हे पाणी हवे असते का? त्यामुळेच असा काही शाश्वत निर्णय होत नाही का? हे प्रश्न नागरिकांसाठी अनुत्तरितच आहेत..साठवण तलावाच्या पाण्याच्या गळतीविषयी अनेकदा मुख्याधिकाऱ्यांना विचारणा केली; पण नियोजनाचा अभाव लक्षात आला. पाणी गळती व उपशामुळे सामान्य नागरिकांस पिण्यासाठी तीन-पाच दिवसांनंतर पाण्याचा पुरवठा होतो. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागाचे टँकर यावरूनच भरले जातात. साठवण तलावाची क्षमता कमी असल्याने व वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रथम पाणीपुरवठा करण्यात यावा. पालिका करपट्टी, पाणीपट्टी वसुली करण्यासाठी मोहीम राबविते, मग पाणी प्रश्नाच्या संदर्भात अशी डोळेझाक का?- अमोल खंडू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, येवला.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.