३०-२
''जीवन प्रमाणपत्रा''च्या नावाने
निवृत्ताला सहा लाखांचा गंडा
सायबर भामट्यांचा प्रताप, गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : बँकेचे जीवन प्रमाणपत्र त्वरित अपडेट न केल्यास खाते बंद होईल, अशी भीती घालून रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची ५ लाख ९२ हजार ४४५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ ऑक्टोबरला घडली.
मनोहर रामकृष्ण घोडेकर (७४, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, इगतपुरी) यांच्या फिर्यादीनुसार, ते रेल्वे खात्यातून निवृत्त असून पेन्शनद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. फिर्यादी घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने आपण ''एसबीआय''मधून बोलत असल्याचे सांगत आपले नाव अजयकुमार असल्याचे भासवले. ‘पेन्शन खात्याचे जीवन प्रमाणपत्र लवकरात लवकर अपडेट करा, अन्यथा बँक खाते बंद होईल, अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर त्याने व्हॉट्सॲपवरून एक एपीके फाईल फॉर्म भरण्याची लिंक पाठवली. घोडेकर यांनी बँकेत जाऊन फॉर्म भरण्याचे सांगितले असता, ‘हा ऑनलाइन फॉर्म आत्ताच भरावा लागेल, असे सांगून त्याने त्यांना घाईत टाकले. घाईगडबडीत फिर्यादीने लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती भरली आणि मोबाईलवर आलेला ओटीपीदेखील सायबर भामट्याला सांगितला.
दुसऱ्या दिवशी, २९ ऑक्टोबरला घोडेकर त्यांच्या इगतपुरी एसबीआय शाखेत पैसे काढण्यासाठी गेले असता, खात्यात पैसे शिल्लक नसल्याचे समोर आले. बँक खात्याचे स्टेटमेंट काढले असता, पेन्शन खाते आणि चालू खात्यातून विनापरवानगी एकूण ५ लाख ९२ हजार ४४५ रुपयांची रक्कम परस्पर हस्तांतरित झाल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ निरीक्षक नागेश मोहिते तपास करीत आहेत.