एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे
३ नोव्हेंबरला धरणे आंदोलन
दिवाळीपूर्वी थकबाकी द्या; शासनाकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २७ : एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित आर्थिक देणी दिवाळीपूर्वी अदा करावीत, याबाबत ३ नोव्हेंबर रोजी आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार अशी माहिती राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव सुरेश चांगरे यांनी दिली.
धरणे आंदोलनाबाबत मंगळवारी एसटीच्या निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विभागीय सचिव सुरेश चांगरे, केंद्रीय सदस्य गुलाब शेख यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी अभय सहजे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जळगाव विभागात सुमारे १५ हजार निवृत्त कर्मचारी असून, त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम, वेतनवाढीतील फरक, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच अन्य आर्थिक देणी अद्याप प्रलंबित असल्याचे संघटनेने सांगितले. करार कालावधीतील थकबाकी एकरकमी द्यावी, तसेच २०२० ते २०२४ या काळातील भविष्य निर्वाह निधी व उपदानातील फरकाची रक्कम तातडीने अदा करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच एसटीच्या ई-बससह सर्व प्रकारच्या बसमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर मोफत प्रवासाचा पास द्यावा, किमान ७,५०० रुपये अधिक महागाई भत्ता इतके पेन्शन मिळावे, तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेले पेन्शन सुरू करावे आणि कोविड काळातील भत्ता तसेच रजा रोखीकरणाची रक्कम द्यावी, अशा मागण्याही संघटनेने केल्या आहेत.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन
आंदोलन नवीन बसस्थानक येथील विभागीय कार्यालयासमोर ३ नोव्हेंबरला दुपारी बाराला केले जाणार आहे. तसेच याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देखील दिले जाणार असल्याची माहिती चांगरे यांनी दिला.