पान तीन किंवा जागा नसल्यास पान दोनवर घेणे
-------------
31372
नाशिकः महापालिका शाळांची रविवारी पाहणी करताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे. समवेत इतर पदाधिकारी, अधिकारी.
----
बंद शाळा सुरु करण्याचा कृती आराखडा तयार करा
मंत्री दादा भुसेः शहरातील महापालिका शाळांच्या पाहणीदरम्यान दिले निर्देश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, नवीन नाशिक, नाशिक रोड, ता. ४ः येथील महापालिका हद्दीतील बंद असलेल्या शाळांची आवश्यक दुरुस्ती व पायाभूत सुविधा उपलब्ध करत पुन्हा सुरू केल्या जातील. या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी नियोजन करण्याच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले.
मंत्री भुसे यांनी रविवारी (ता.४) नाशिक शहरातील पंचवटीतील महापालिका प्राथमिक शाळा क्र. ३०, सिडकोतील महापालिका माध्यमिक शाळा तसेच जेलरोड येथील महापालिका शाळा क्र. ५६ येथे भेट देत पाहणी केली. यानंतर त्यांनी सूचना दिल्या. महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे यांच्यासह प्रशासन अधिकारी मीता चौधरी, नाशिक रोड विभाग सभापती रमेश धोंगडे, केंद्रप्रमुख दत्तात्रेय सूर्यवंशी, नगरसेवक कैलास मुदलीयार, सुनीता भोजणे आदींसह पदाधिकारी, शिक्षकवृंद उपस्थित होते.
मंत्री भुसे यांनी शाळांमधील उपलब्ध शैक्षणिक सुविधा, वर्गखोल्या, इमारतींची सद्यस्थिती, पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीचा आढावा घेतला. महापालिका हद्दीतील सध्या बंद असलेल्या सर्व शाळांची स्थिती तपासून त्यांचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. इमारती अथवा परिसरात दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या शाळांची कामे प्राधान्याने पूर्ण करावी. शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, वर्गखोल्या तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या. शाळांच्या पाहणीदरम्यान उपलब्ध शैक्षणिक साधने, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तसेच आवश्यक असलेल्या सुधारणांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
----
‘सीएसआर’ निधीसाठी प्रयत्न
पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री दादा भुसे म्हणाले, की तीन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत पटसंख्या अभावामुळे शाळा बंद झाल्याची चर्चा होती. या शाळा पूर्ववत सुरू करण्यासंदर्भातील नियोजन करण्याविषयी महापौर, उपमहापौर सर्वांनी निर्णय केला होता. प्रत्यक्ष पाहणी करताना यातील पाच-सहा शाळांची डागडुजी रंगरंगोटी झाल्याचे आढळले असून, काही शाळा तात्काळ सुरु होतील. शाळा दुरुस्तीबाबत विद्यार्थ्यांवर आर्थिक बोझा येणार नाही. सीएसआर निधीचा वापर करण्यासह काही कंपन्या दत्तक घेऊ इच्छित असतील, त्यांच्यावर शाळेची जबाबदारी दिली जाईल. आठवड्याभराच्या आत नाशिकच्या शाळांचा अहवाल महापौर यांच्यासमोर येईल. पालकांचा कल लक्षात घेता सेमी-इंग्रजी वर्ग सुरु केले जातील, असे त्यांनी सांगितले.
---------------
चौकट
भुसे यांचा ठाकरे बंधूंना टोला
निवडणूक आयुक्तांच्या विरोधात उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी मुंबईत मोर्चा काढल्यानंतर शिक्षणमंत्री मंत्री दादा भुसे यांनी या या मोर्चावर टिका केली आहे. निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्याचे खापर फोडले जाते. पण एवढा वेळ दुष्काळग्रस्त भागाला भेट देण्यासाठी दिला असता तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता, असे टोला मंत्री भुसेंनी लगावला. भुसे म्हणाले, जिल्ह्यातील अजून दोन ते तीन तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट होवू शकतात. पावसाने दिलेला खंडाच्या निकषांच्या आधारे त्यांचा समावेश होवू शकतो. निकषांत बसले नाही तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिकांचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे भुसे म्हणाले. लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांशी संवाद साधत असून त्यांना दिलासा देण्याचे काम करत आहेत. नेहमी राजकारण करत राहणाऱ्या लोकांनी शेतकऱ्यांपर्यंत जायला हवे, असा सल्ला मंत्री भुसे यांनी दिला.
….
चौकट
चिवटेंचे काम चांगले
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. मंगेश चिवटे यांचे पुणे मतदारसंघात चांगले काम आहे. पण राजकीयदृष्ट्या कुठली जागा कुणाला सोडायची याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेतात. त्यामुळे जागा वाटपाविषयी नाराजी असण्याचे काहीच कारण नसल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.