माहिती अधिकार दिनानिमित्त
मुक्त विद्यापीठात व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : आंतररराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात व्याख्यान झाले. ‘माहितीचा अधिकार : लोकशाही सक्षमीकरणाचे साधन’ या विषयावर विद्यापीठातील शैक्षणिक संयोजक डॉ. सुनील गावंडे यांनी संवाद साधला.
कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन व कुलसचिव प्रा. सुरेंद्र पाटोळे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेतर्फे कार्यक्रम झाला. मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे संचालक नागार्जुन वाडेकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. सुनील गावंडे यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारा २८ सप्टेंबर हा ‘माहितीच्या सार्वत्रिक उपलब्धतेचा आंतरराष्ट्रीय दिन’ जाहीर होण्यामागील पार्श्वभूमी कथन केली. त्याआधी २००५ पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा कार्यान्वित असल्याचे सांगितले. माहितीचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण साधन असल्याचे स्पष्ट केले. नागार्जुन वाडेकर यांनी लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग, माहितीची उपलब्धता, प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. राजेंद्र वाघ, प्रा. विजयकुमार पाईकराव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सुनील भारूडकर यांनी केले. आभार डॉ. बाळासाहेब दिघे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संजय खरात, डॉ. प्रमोद वाघ, वरिष्ठ सहाय्यक सुप्रिया कोकाटे, गुलाब घाटाळ, राज आचारी यांनी परिश्रम घेतले.