Road Damage : तपोवन मार्गावरील रस्ता खचला; वर्दळीचा भाग झाला धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A demolished road to Tapovana.

Road Damage : तपोवन मार्गावरील रस्ता खचला; वर्दळीचा भाग झाला धोकादायक

पंचवटी (जि. नाशिक) : तपोवनाकडे जाणाऱ्या मार्गावर नाल्यातील पाणी जाण्यासाठी असलेल्या छोट्या मोरीच्या भागातील रस्ता खचला आहे. येथे सुरक्षेसाठी केलेल्या रेलिंगचा अँगल निघाला आहे. हा रस्ता आणखी खचण्याची शक्यता निर्माण झाल्याने हा वर्दळीचा भाग धोकादायक झाला आहे. (Road Damage road on Tapovan route is damaged Traffic become dangerous Nashik News)

तपोवन कॉर्नरच्या भागात महामार्गासह तपोवन, सर्व्हिस रोड, पंचवटी महाविद्यालय, टकलेनगर, कृष्णनगर, जुना आडगाव नाका, असे रस्ते येऊन मिळतात. महामार्गावरील उड्डाणपुलाखाली या परिसरात चौफुली आहे. तपोवनाकडे जाणारी वाहने, पादचारी या चौफुलीवरूनच ये-जा करीत असतात. महामार्गाकडून तपोवनाकडे जाण्याचा मार्गाच्या उत्तरेला खड्डा असून, तेथून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी खाली सिमेंटचे पाइप टाकले आहेत. त्यातून पाणी वाहून पुढे जाते. हा भाग उताराचा असल्यामुळे सर्व बाजूंनी येणारे पावसाचे वाणी वाहून नाल्यासारख्या खड्ड्याकडे जाते.

यंदाच्या सातत्याने पडणाऱ्या जोरदार पावसामुळे येथून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढले होते. या पाण्याच्या प्रवाहामुळे येथील डांबरी रस्ता खचला आहे. येथे सुरक्षेसाठी लावलेले भरभक्कम रेलिंगांचा छोटा खांब मुळापासून निघाला आहे. त्यासाठी लावण्यात आलेल्या सिमेंटचा गटही निघाला आहे. तो लोंबकळत असल्यासारखे दिसत आहे. डांबरी रस्ता खचू लागल्याने येथून जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा: CM Eknath Shinde Group : कट्टर शिवसैनिक वसंत पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

तपोवन धार्मिक पर्यटनस्थळ असल्याने येथे जाणाऱ्या पर्यटकांची व भाविकांची वाहने याच कॉर्नरच्या भागातून जातात. या मार्गावर पुढे अनेक धार्मिक संस्थांचे मंदिरे, कार्यालये, निवासस्थाने आहेत. कपिला संगम, रामसृष्टी उद्यान येथे येणाऱ्यांचीही वाहने येथून ये-जा करीत असतात.

महामार्गाच्या सर्व्हिस रोडलगतच्या भागात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विविध महाविद्यालये आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची येथे वर्दळ असते. अशा वर्दळीच्या भागातील खचत असलेल्या रस्त्याबाबत दखल घेणे गरजेचे आहे. येथील खचणाऱ्या रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

हेही वाचा: NMC Property Tax Recovery: घरपट्टी वसुलीसाठी आजपासून पुन्हा 'ढोल बजाव' मोहीम सुरू