पान दोन मेन
------------------
05210
अंबासन : सारदे गावातील रस्त्याच्या उघड्या असलेल्या साइडपट्ट्या.
नामपूर-लखमापूर रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने
उघड्या साइडपट्ट्या, सूचना फलकांच्या अभावामुळे अपघातांचा धोका
सकाळ वृत्तसेवा
अंबासन, ता. १४ : नामपूर ते लखमापूर या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत संथगतीने सुरू असल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच उघड्या साइडपट्ट्या आणि गतिरोधकांजवळ सूचना फलकांचा पूर्णपणे अभाव असल्याने अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. संबंधित ठेकेदाराने या कामाला तातडीने गती देऊन रस्ता लवकरात लवकर वाहनचालकांसाठी सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
सारदे, वायगाव, दुंधे, तळवाडे तसेच निंबोळा या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, कामाची गती अत्यंत संथ असल्याने वाहनधारकांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून, दुचाकीस्वार, चारचाकी वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच रस्त्याचे काही भाग अपूर्ण असल्याने वाहन चालविताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. दरम्यान तळवाडे गावाजवळ पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम प्रगतिपथावर असले तरी सारदे, वायगाव आणि दुंधे गावांच्या परिसरातील रस्त्याच्या साइडपट्ट्या उघड्याच आहेत. रस्त्याच्या कडेला योग्य प्रकारे मुरूम भराव किंवा पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले नसल्याने वाहनांना बाजू देताना अथवा समोरून वाहन आल्यास मोठी कसरत करावी लागते. विशेषतः दुचाकीस्वारांना या उघड्या पट्ट्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणांचा अंदाज येणेही कठीण होत असल्याने वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नामपूर ते तळवाडे गावापर्यंत अनेक ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत.
मात्र, या गतिरोधकांच्या आधी कोणतेही दिशादर्शक अथवा सावधानतेचे सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. अनेक ठिकाणी अपूर्ण काम आणि सूचना फलकांचा अभाव दिसून येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित ठेकेदाराने सारदे, वायगाव व दुंधे येथील साइडपट्ट्यांवर तातडीने मुरूम भराव करून पेव्हर ब्लॉक बसवावेत. तसेच सर्व गतिरोधकांच्या आधी आणि जवळ आवश्यक सूचना फलक लावून रस्त्याचे उर्वरित काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
05209
ज्याठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत, त्या ठिकाणी तातडीने सूचना फलक लावण्यात यावेत. गावाजवळ गटारींचे काम झाले आहे, मात्र त्यालगत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. पेव्हर ब्लॉकचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
संदीप अहिरे, माजी उपसरपंच, दुंधे.