‘रोटरी’ सदस्यांच्या खरेदीमुळे
विक्रेत्यांच्या आयुष्यात आनंद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वोकल फॉर लोकल या संकल्पनेने प्रेरित होऊन रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या सदस्यांनी रविवारी (ता.१) टॉवर चौकात छोट्या पथविक्रेत्या व स्थानिक व्यावसायिकांकडून खरेदी केली. यानिमित्ताने विक्रेत्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पेरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमात क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र जैन, अध्यक्ष ॲड. केतन ढाके, प्रोजेक्ट चेअरमन कल्पेश दोशी, माजी अध्यक्ष विपुल पारेख, विष्णू भंगाळे व महेंद्र गांधी, विनय सुरतवाला, अजय चुगरा, तुषार भदाणे, यशपाल मंत्री, डॉ. सौरभ जोशी, अजितकुमार वाणी, ऋषिका ढाके यांनी स्थानिक व्यापारी व छोट्या पथविक्रेत्यांकडून ९ ते १० हजार रुपयांची खरेदी करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. या छोट्याशा खरेदीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य व त्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला; असे अध्यक्ष ॲड. केतन ढाके यांनी सांगितले. पणत्या, आकाश कंदील, रांगोळ्या, केरसुणी व पूजेसाठी आवश्यक इतर वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा व आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला हातभार लावण्याचा एक छोटासा पण अर्थपूर्ण हा प्रकल्प असल्याचे प्रोजेक्ट चेअरमन कल्पेश दोशी यांनी सांगितले.