रोटरी महावाचन अभियानाला
वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हजारो विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१७ : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी व. वा. जिल्हा वाचनालय आणि रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ‘रोटरी महावाचन अभियाना’ला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी नऊपासून शेकडो नागरिकांसह हजारो शालेय विद्यार्थ्यांनी वाचनालयात येऊन आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन करत अभियानात सहभाग नोंदविला.
रोटरीचे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहप्रांतपाल अनिल कांकरिया, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, उपाध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, कार्याध्यक्ष सी.ए. अनिलकुमार शाह, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके, प्रकल्पप्रमुख गिरीश कुलकर्णी आणि वाचनालयाचे ५६ वर्षांपासूनचे सभासद सुरेश महाबळ उपस्थित होते. डॉ. राजेश पाटील यांनी महावाचन अभियानाचे कौतुक केले. वाचनालयाने सुरू केलेली ‘गिफ्ट कार्ड’ ही अभिनव संकल्पना युवा पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. तसेच रोटरीच्या जळगाव परिवारातील सर्व क्लबना या उपक्रमासाठी प्रोत्साहित करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक सीए अनिलकुमार शाह यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. अपर्णा भट-कासार यांनी केले. यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
चौकट
ज्येष्ठ सभासदांचा सन्मान
वाचनाची परंपरा जपणाऱ्या ज्येष्ठ सभासदांचा यावेळी गौरव करण्यात आला. सुरेश महाबळ, रामसिंग पाटील आणि बाळू गावंडे यांच्यासह तीस वर्षांपेक्षा अधिक काळ वाचनालयाचे सभासद असलेले अनिल जगताप, वसंत शिंदे, भास्कर महाजन, कृष्णा वीरकर आणि नितीन बापट यांना त्यांच्या घरातील युवा पिढीसाठी गिफ्ट कार्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.