NSK26H32639
जळगाव : रोटरी महावाचन अभियान उद्गाटनप्रसंगी बोलताना डॉ. राजेश पाटील. शेजारी अनिल कांकरिया, डॉ. प्रदीप जोशी, ॲड. सुशील अत्रे, सी.ए. अनिलकुमार शाह आदी.
–––
रोटरी महावाचन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : व. वा. जिल्हा वाचनालय आणि रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित रोटरी महावाचन अभियानाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रोटरीचे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सहप्रांतपाल अनिल कांकरिया, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, उपाध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, कार्याध्यक्ष सी.ए. अनिलकुमार शाह, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके, प्रोजेक्ट चेअरमन गिरीश कुलकर्णी, ५६ वर्षापासून वाचनालयाचे सभासद असलेले सुरेश महाबळ या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. राजेश पाटील यांनी रोटरी महावाचन अभियान हा चांगला उपक्रम असून वाचनालयाची गिफ्ट कार्ड ही अभिनव संकल्पना असून रोटरी जळगाव परिवारातील सर्व क्लबला या विषयी प्रोत्साहित करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमात सुरेश महाबळ यांच्यासह वाचनालयाचे प्रदीर्घ काळापासून सभासद असलेले रामसिंग पाटील, बाळू गावंडे यांच्यासह तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सभासद असलेले अनिल जगताप, वसंत शिंदे, भास्कर महाजन, कृष्णा वीरकर, नितीन बापट यांना त्यांच्या घरातील युवा पिढीसाठी गिफ्ट कार्ड मान्यवरांच्या हस्ते भेट देऊन सन्मानित करण्यात आले. अनिलकुमार शाह यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अपर्णा भट - कासार यांनी सूत्रसंचालन केले.