रोटरी वेस्टकडून जागर उपक्रमाद्वारे
अडीच हजार विद्यार्थिनींचे प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे ''जागर’ या उपक्रमाद्वारे गेल्या ९ दिवसांत विविध सात शाळांमधील पाचवी ते दहावीमधील दोन हजार पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थिनींचे प्रबोधन करण्यात आले.
रोटरी जळगाव वेस्टचे अध्यक्ष योगेश राका, मानद सचिव बिपिन काबरा व प्रोजेक्ट चेअरमन सरिता खाचणे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. या उपक्रमात रोटरी वेस्टच्या डॉ. सोनल इंगळे, डॉ. प्रीती भारुडे, डॉ. अर्चना काबरा व नंदलाल गादिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बारी समाज माध्यमिक विद्यालय शिरसोली, अभिनव माध्यमिक विद्यालय, बालविश्व शाळा, थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद, शारदाश्रम विद्यालय, रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल व सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या शाळांमधील विद्यार्थिनींचा त्यात समावेश होता.
या कार्यक्रमात विद्यार्थिनींना किशोर वयातील हार्मोनल बदल, वैयक्तिक स्वच्छता, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक जाणीव व नागरी शिस्त व स्वसंरक्षण याविषयी माहिती दिली. मुलींच्या शरीरात होणारे नैसर्गिक बदल, त्या बदलांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता व आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भात ताणतणावाचे व्यवस्थापन, भावनांवर नियंत्रण, सकारात्मक विचारसरणी व आत्मविश्वासाचे महत्त्व सांगितले. डॉक्टरांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी गरिमा राका, सरिता काबरा, मुनिरा तरवारी, प्रिया झंवर, शिल्पा सफळे, रोटरक्ट वेस्टच्या मानद सचिव सेजल बाहेती यांच्यासह रोटरी वेस्टच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.