(पान ४ ला ॲंकर)
SHC26B13523
रोहिणी (ता. शिरपूर) : युवकांना मार्गदर्शन करताना डॉ. तुषार रंधे. व्यासपीठावर पदाधिकारी.
--------
ग्रामीण भागातील क्षमतेला देणार न्याय
डॉ. तुषार रंधे : रोहिणी येथे सैन्य- पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. २२ : ग्रामीण, आदिवासी भागातील युवकांमध्ये मोठी क्षमता आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास देशसेवेसह कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रांची मालिका साकारत असून, त्यातून मोठ्या प्रमाणात युवकांच्या क्षमतेला न्याय मिळेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी दिली.
रोहिणी (ता. शिरपूर) येथे किविप्र संस्थेतर्फे कर्मवीर सैन्य- पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राला नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. माजी सभापती कैलास पावरा, सुक्राम पावरा, रामदास कोळी, सरपंच डॉ. आनंदराव पावरा, भोईटीचे सरपंच दीपक पावरा, चिलारेचे सरपंच सुनील ठाकरे, उपसरपंच राजधर पावरा, लाकड्या हनुमानचे सरपंच सुभाष पाडवी, आंबेचे सरपंच प्रीतम पावरा, बादशाह बंजारा, बन्सीलाल बंजारा, भटक्या-विमुक्त जाती- जमाती संघटनेचे जिल्हाध्यक्ष पिंटू बंजारा, खरेदी- विक्री संघाचे संचालक कंवरसिंग बंजारा, देविदास कोळी, रवींद्र कोळी, गोकुळ भिल, पोलिस पाटील सुभाष पावरा आदी उपस्थित होते.
श्री. रंधे म्हणाले, की तालुक्यातील हे चौथे प्रशिक्षण केंद्र आहे. भरती प्रक्रियेत केवळ शारीरिक क्षमता पुरेशी नसून बौद्धिक तयारी, सामान्य ज्ञान, नियमित सराव, शिस्त, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास यांनाही महत्त्व असते. हे लक्षात घेऊन प्रशिक्षणार्थींच्या सर्वांगीण तयारीवर भर दिला जाईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, ग्रामीण आणि दुर्गम भागातील होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागू नये याची काळजी घेतली जाणार आहे. प्रशिक्षणार्थींना मोफत गणवेश, शारीरिक सरावासाठी मैदान, ग्रंथालय, सराव प्रश्नपत्रिका, प्रशिक्षण वर्ग आणि सैन्यदल व पोलिस भरतीसाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे. विजय बागूल व अमृत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हिंमत शिरसाट यांनी आभार मानले. मुख्याध्यापक प्रल्हाद सोनार, सुभाष पाटील, मोहनीश सूर्यवंशी आदींनी संयोजन केले.
उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रशिक्षणार्थींनी गावातून रॅली काढली. संस्थेचे विश्वस्त रोहित रंधे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरवात झाली. त्यात परिसरातील विविध गावांचे सरपंच, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ सहभागी झाले.