फोटो : NSK26H31388
नंदुरबार : रग्बी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटविणारा एस. ए. मिशन हायस्कूलचा संघ.
-----------------
जिल्हा शालेय रग्बी स्पर्धेत
मिशन हायस्कूलचे वर्चस्व
नंदुरबार, ता. ६ : येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला- मुलींच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत यजमान एस. ए. मिशन हायस्कूलच्या मुलांच्या संघाने तिन्ही वयोगटांत, तर १९ वर्षातील वयोगटात मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात एस. ए. मिशन हायस्कूलने आक्रमक खेळ करीत श्रॉफ हायस्कूलचा २- ० अशा फरकाने पराभव केला. १७ वर्षांखालील मुले गटात मिशन हायस्कूलच्या खेळाडूंनी शानदार रणनीती आखत श्रॉफ हायस्कूलला २- ० ने धूळ चारली. १९ वर्षांखालील मुले गटात अंतिम सामन्यात मिशन हायस्कूलच्या संघाने अँग्लो उर्दू हायस्कूलवर १-० अशी मात करत विजेतेपदावर मोहर उमटवली.
विभागीय स्पर्धेसाठी निवड
या जिल्हास्तरीय स्पर्धेत तिन्ही वयोगटांत अजिंक्यपद मिळवणारे एस. ए. मिशन हायस्कूलचे विजयी संघ आता नाशिक येथे आगामी विभागीय शालेय रग्बी स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक खुशाल शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, चेअरमन मार्था अक्का सुतार आणि प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक केले.