सच की पाठशाला : एक निष्ठावान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन | Latest marathi article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Sarvepalli Radhakrishnan

सच की पाठशाला : एक निष्ठावान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून जगविख्यात असलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची मूळ ओळख ‘एक निष्ठावान शिक्षक’ अशी आहे. शिक्षणाविषयी अतोनात आस्था आणि शिक्षकांविषयी विलक्षण आदर त्यांच्या मनात ओतप्रोत भरलेला होता.

उत्कृष्ट लेखक, तत्त्वज्ञानी, वेदांती पंडित असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन स्वतः उत्तम शिक्षक होते. त्यांनी चाळीस वर्षं विविध पदांवरून शिक्षणक्षेत्रात वेगवेगळी भूमिका बजावली आहे. (Sach Ki Pathshala Loyal Teacher Dr Sarvapalli Radhakrishnan nashik Latest Marathi article)

शिक्षकांचं कार्य आणि त्यांचं योगदान या बाबींची त्यांना परिपूर्ण कल्पना होती. म्हणूनच आपला वाढदिवस राष्ट्रीय पातळीवर साजरा करायची एक नामी कल्पना त्यांना सुचली. ५ सप्टेंबर हा आपला वाढदिवस भारतभर ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा व्हावा, त्या दिवशी आदर्श शिक्षकांचा यथोचित सन्मान व्हावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

ती इच्छा फलद्रूप केली जे. पी नाईक यांनी. खरोखरच ५ सप्टेंबर हा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून भारतभर साजरा होतो. स्वतःपलीकडे इतका व्यापक विचार करून तो कृतीत उतरविणारी माणसं दुर्मिळ असतात.

हा दिवस राष्ट्र दिमाखात साजरा करतं. शासकीय पातळीवर आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. अगदी राज्याराज्यांतल्या, खेड्यापाड्यातल्या शाळांमधून शिक्षकांना गौरवण्यात येतं. इतकंच नाही, गावखेड्यातली, शहरातली छोटी-मोठी मुलं शाळा-महाविद्यालयातल्या आपल्या शिक्षकांना हमखास गुलाबाचं टपोरे फूल देऊन कृतज्ञता व्यक्त करतात.

एकाच वेळी सखोल, सूक्ष्म आणि व्यापक विचार करणाऱ्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं व्यक्तिमत्त्वही आगळं वेगळं नि सर्वांत उठून दिसणारं असं होतं. पाच फूट अकरा इंच उंची, सडपातळ बांधा, गंभीर आणि तेजस्वी मुद्रा. दाक्षिणात्य पद्धतीचा पांढराशुभ्र टोकदार फेटा ते बांधत असतं. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास इथल्या चित्तोरमध्ये तिरुत्तनी या खेड्यात झाला. हे गाव चेन्नई शहराच्या ईशान्येला ६४ कि.मी. अंतरावर आहे.

मध्यमवर्गीय, ब्राह्मण तेलगू भाषिक कुटुंब. वडील तहसीलदार होते. त्यांचं नाव सर्वपल्ली वीरस्वामी आणि आईचं नाव सीताम्मा होतं. राधाकृष्णन यांचं तसं लहान वयात लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव सिवकामू. त्यांच्या मुली होत्या आणि एक मुलगा होता. त्यांच्या घरात आणि आसपास धार्मिक वातावरण होतं. सर्वपल्ली राधाकृष्णन लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि स्वतंत्र विचारांचे होते.

अंतर्मुख वृत्तीचे होते ते. मित्रांचं कोंडाळं जमवून गप्पाटप्पा करण्यात त्यांना कधी स्वारस्य वाटलं नाही. मित्रमंडळ जमवून धुडगूस घालण्याच्या लहान मुलांच्या वृत्तीला ते अपवाद होते. लहान वयात वाचता येऊ लागल्यापासून त्यांना पुस्तकं वाचण्याचा छंद लागला. ग्रंथच त्यांचे गुरू झाले. ते नित्य त्यांच्या सहवासात राहत असतं.

मोठं झाल्यावर ते म्हणत असतं, ‘मौन सृष्टीत मला आनंद होतो.’ त्यांचं प्राथमिक शिक्षण तिरुत्तनी इथेच झालं. नंतर तिरुपतीला मिशनरी स्कूलमध्ये झालं. मग मद्रास इथल्या ख्रिश्चन कॉलेजमधून ते बी.ए. झाले. प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. मग नीतिशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. केलं. पुढे ‘वेदान्तातील नीतिशास्त्र’ हा प्रबंध लिहिला. तेव्हा ते फक्त २० वर्षांचे होते.

जागतिक कीर्तीचे प्राध्यापक ए.जी. हॉग यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. त्यांनी खूप कौतुक केलं. राधाकृष्णन पट्टीचे वक्ते होते. केंब्रिज विद्यापीठाने त्यांना भाषणासाठी आमंत्रित केलं. ऑक्सफर्डमध्ये ऑप्टन व्याख्यानमालेत त्यांचं व्याख्यान झालं आहे. सर्व भाषणांचा संग्रह प्रसिद्ध आहे. आंध्र विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट बहाल केली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुरवातीला मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठात १९१८ ते १९२१ दरम्यान काम केलं. १९२१ ते १९३६ ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू होते. नंतर १९३९ मध्ये मदनमोहन मालवीय यांच्या सांगण्यावरून ते बनारस विद्यापीठाचे कुलगुरू झाले. तिथे ते प्रशासकीय कारभारही पाहत असतं. अनेक वर्षं ते कुलगुरू होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी विद्यापीठाची प्रगती घडवून आणली.

१९४२ साली ‘चले जाव’ चा ठराव झाला. क्रांतीचे वारे वाहू लागले. क्रांतिपर्वात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. इंग्रज सरकार क्रांतिकारकांना मारत असे आणि जेरबंद करत असे. या गोष्टींपासून विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी डॉ. राधाकृष्णन प्रयत्नशील असतं. ब्रिटिश अधिकारी यांनी विद्यापीठात मार्शल लॉ लागू करून विद्यापीठ ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आणीबाणी लक्षात घेऊन राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व ते प्रयत्न केले; त्यांना घरी जाण्याचा आदेश दिला. जमा रकमेतून पैशांची सोय देखील केली.

पुढे जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा दक्षिण भारतातील विशाखापट्टण, काकिनाडा या बंदरांवर बॉम्ब फेकण्यात आले. भीतीचं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थी घरी जाण्याची इच्छा व्यक्त करू लागले तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांची तातडीची सभा बोलावली आणि तुम्ही इथेच कसे सुरक्षित आहात हे पटवून दिलं.

विद्यार्थ्यांच्या मनातली भीती पळाली आणि राधाकृष्णन यांच्यावरचा त्यांचा विश्वास वाढला. गुणवत्ता नसताना उच्च शिक्षणासाठी प्रवेश देण्याचा विद्यार्थी आणि पालक आग्रह करत तेव्हा ते त्यांना रोखठोकपणे सांगत, “अधिक अभ्यास करा. उत्तम गुण मिळवा आणि मग अभिमानाने छाती पुढे काढून सांगा ‘मला प्रवेश द्या.’ तोंड वेंगाडणं, वशिला लावणं मला पसंत नाही. तेव्हा असा प्रयत्न व्यर्थ ठरेल.”

ते म्हणत, “ज्या क्षणी आपल्यात अहंकार निर्माण होतो त्या क्षणी आपलं ज्ञान आणि शिक्षण संपतं.” ते सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत त्यामुळे ते लोकप्रिय झाले. एकांतात आनंद मानत असलेल्या छोट्या राधाकृष्णन यांचा इथपर्यंतचा प्रवास खूपच लक्षणीय ठरतो. अधिकाराने बोलण्याची कुवत त्यांनी व्यासंगातून प्राप्त केलेली होती.

त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विश्वविद्यालयांची पाहणी करण्यासाठी भारत सरकारने जेव्हा युनिव्हर्सिटी कमिशन नेमलं तेव्हा त्याचं अध्यक्षपद भूषवण्याचा मान त्यांना मिळाला. आंध्र विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही पदवी प्रदान केली. इंग्लंडने त्यांना सन्मानपूर्वक 'सर' ही पदवी बहाल केली. या उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्वाचा 'भारतरत्न' या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ही झाली डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन या असामान्य व्यक्तिमत्त्वाची शब्दांत न सामावणारी औपचारिक माहिती.

खरं शिक्षण कोणतं? जे त्या व्यक्तीच्या जगण्यातून पदोपदी जाणवतं ते. जीवन संस्कारित करतं ते. या सर्व गोष्टी राधाकृष्णन यांच्या संदर्भात लखलखीतपणे जाणवतात. त्यांच्या विचार आणि आचारात एकसूत्रता होती. भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. पण तो कधीही केवळ वाचिक आणि शाब्दिक अभ्यास ठरला नाही.

श्रेणी प्राप्त करण्यासाठी तो केलेला नव्हता. तर त्यांच्या व्यासंगामुळे त्यांना प्रथम श्रेणी प्राप्त होत असे. ते स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदर्श मानत असतं. त्या दोघांच्या विचारांचा त्यांनी सखोल वेध घेतलेला होता. अध्ययन केलेलं होतं. इतकंच नाही तर ते आचरणात आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. भारतीय तत्त्वज्ञान पाश्चात्त्यांना पटवून देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.

पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्विलासवादाचा तात्त्विक परिचय करून देणारे ब्रिटिश सत्ताकाळातले महत्त्वाचे विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखलं जातं. चिद्‌विलासवाद हा मूलतः अनुभववाद आहे. सर्वत्र केवळ आत्मत्त्वाचे स्फुरण चैतन्य आहे अन्य काहीच नाही, असा हा सिद्धांत आहे.

भारतीय तत्त्वज्ञानचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. तिथे त्यांच्या नावे अध्यासन निर्माण करण्यात आलं. त्यांच्या कामाचं महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बीक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.

राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रश्न होते. नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? यादृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न- प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत आधुनिक पद्धतीने कसं समजावून सांगता येईल? तिसरा प्रश्न- मानवजातीचं भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती? कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत असं नरहर कुरुंदकर लिहितात.

हेही वाचा: ध्वज लहरावा प्रगतीचा

मला असं वाटलं हे तीन प्रश्न म्हणजे खरं तर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून जीवनासंदर्भात मिळालेली उत्तरं आहेत. तो काही त्यांच्या मनातला गोंधळ नाही, जो प्रश्नांच्या रूपाने ते मांडत असतं. या तीन प्रश्नांमधून श्रेष्ठ जगण्याच्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत.नवा माणूस कसा असायला हवा याची दिशाच त्यांनी दर्शवलेली आहे. त्यांना नव्हे तर सर्वांना हे प्रश्न पडले तर उत्तरांच्या अपेक्षित माणूस अर्थपूर्ण जगू लागणार आहे.

असे तत्त्वज्ञानचे गाढे अभ्यासक उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती म्हणून भारताला लाभले. १३ मे १९५२ पासून १३ मे १९६२ पर्यंत ते देशाचे उपराष्ट्रपती होते. १३ मे १९६२ रोजी त्यांनी राष्ट्रपतिपदाची जबाबदारी स्वीकारली. पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या तुलनेत त्यांचा कार्यकाळ अधिक आव्हानांनी युक्त होता. कारण त्याच दरम्यान भारताचं चीन आणि नंतर पाकिस्तानशी युद्ध झालं.

अर्थातच देशाची परिस्थिती, देशातलं वातावरण सर्वसामान्य राहिलं नव्हतं. ते हाताळणं ही मोठी कसोटी होती. हे आव्हान त्यांनी समर्थपणे पेललं. त्यांनी वेळोवेळी आपली कर्तव्यं तर पार पाडलीच. इतकंच नाही तर, जगभरात भारताचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं.

सोव्हिएट युनियनमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण काम केलं. ते युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते. ते शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ, शिक्षक होते. तसंच ते प्रतिभाशाली लेखक होते. विपुल अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. त्यांत उपनिषदांचं तत्त्वज्ञान, जीवनाचा एक आदर्शवादी दृष्टिकोन, वेदांताचं नीतिशास्त्र अशा सर्वोत्कृष्ट रचनांचा समावेश आहे.

त्यांना ‘टेम्पलेटन’ हे जगप्रसिद्ध पारितोषिक मिळालेलं आहे. ते एक चांगले राजकारणी होते आणि त्यांनी नेहमीच लोकशाही मूल्यांना महत्त्वं दिलं. लोकशाही म्हणजे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य.’ व्याख्या सगळ्यांना पाठ असते पण तिचा अर्थ लक्षात घेऊन त्याचं भान बाळगणं फार महत्त्वाचं असतं. ते भान आपल्या या स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपतींनी बाळगलं आणि देशाला प्रगतिपथावर नेलं.

भारतीय तत्त्वज्ञान त्यांनी जगताना अनुभवलं. साऱ्या पुस्तकी व्याख्या जगताना जो माणूस अंमलात आणतो तो खरा ‘सुशिक्षित’ माणूस! पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. वैचारिकतेला देशकालाच्या सीमा नसतात हे राधाकृष्णन पूर्णतः जाणून होते. म्हणूनच कायम एक समतोल त्यांना प्रत्येक ठिकाणी साधता येत होता. म्हणूनच त्यांचे विचार आपण आजही आणि उद्याही विद्यार्थ्यांना सातत्याने समजावून सांगितले पाहिजेत. त्यातूनच बऱ्या वाईटाची पारख करण्याचं तारतम्य त्यांना निश्चित प्राप्त होईल.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे खरोखरच संतुलित व्यक्तिमत्त्वाचं उत्तम उदाहरण आहेत. खरं तर त्यांचा आणि राजकारणाचा मुळात काडीमात्र संबंध नव्हता. राजकारणातल्या काही लोकांनी त्यांना चांगलं पारखलं होतं. त्यांच्यासारख्या संवेदनशील आणि उच्च विद्याविभूषित माणसाचं महत्त्व जाणलं होतं म्हणूनच त्यांना संविधान सभेचे सदस्य होण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं यातच आव्हानांना सामोरं जाण्याची त्यांनी मिळवलेली ताकद दिसून येते.

शिक्षणाने मिळवायची असते ती हीच ताकद आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना आपण डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं व्यक्तिमत्त्व नीट समजावून दिलं पाहिजे. त्यामुळे व्यासंग म्हणजे काय ते त्यांना कळून येईल आणि एक नवी प्रेरणा घेऊन विद्यार्थी खऱ्या अभ्यासातून व्यासंगाकडे वळतील. नुसतेच विद्यार्थी नाही तर शिक्षक सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेतील म्हणूनच त्यांचा वाढदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. एप्रिल १९७५ मध्ये प्रदीर्घ आजाराने, वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. मात्र या व्यासंगपूर्ण विचारवंताच्या वैचारिक पाऊलखुणा अभिमानास्पदरित्या देशासाठी दिशादर्शक ठरत आहेत. आपण त्या ओळखायला मात्र हव्यात.

(लेखक शिक्षण अभ्यासक आहेत.)

हेही वाचा: निष्ठावंत पैलवान!

Web Title: Sach Ki Pathshala Loyal Teacher Dr Sarvapalli Radhakrishnan Nashik Latest Marathi Article

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..