हा लेख चौथ्या क्रमांकावर टाकावा, डॉ. मानसी पवार यांच्या लेखानंतर
इंटरनेट, स्मार्टफोन्समुळे माहिती बोटाच्या टोकावर
----------------------------------------
सुरक्षित, तणावमुक्त प्रवासासाठी नियोजन महत्त्वाचे
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून विश्रांती मिळवण्यासाठी पर्यटन हा उत्तम मार्ग ठरतो. आजकाल महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणे असोत, भारतातील विविध राज्ये किंवा परदेशवारी; मित्र आणि कुटुंबीयांसह फिरण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोन्समुळे पर्यटनाशी संबंधित सर्व गोष्टी बोटांच्या टोकावर आल्या असल्या, तरी योग्य नियोजनाअभावी कधीकधी सहलीचा आनंद विरू नये म्हणून अचूक पूर्वतयारी आवश्यक ठरते. सुलभ आणि संस्मरणीय सहलीसाठी पूर्वतयारी व नियोजन गरजेचे ठरते. यातील महत्त्वाचे टप्पे आपण या लेखातून जाणून घेऊया..
- प्रतिनिधी
प्रारंभी ठिकाण, कालावधी आणि बजेट निश्चित करा. सहलीची सुरुवात नेमके कुठे जायचे, किती दिवसांसाठी जायचे आणि प्रतिव्यक्ती किती खर्च अपेक्षित आहे, हे ठरवून घ्या. ऋतूनुसार ठिकाणाची निवड महत्त्वाची ठरते; जसे की पावसाळ्यात सह्याद्रीच्या दर्याखोऱ्या, हिवाळ्यात राजस्थान किंवा केरळ, तर उन्हाळ्यात थंड हवेची ठिकाणे. बजेटमध्ये प्रवास, निवास, जेवण, स्थानिक फिरणे आणि आपत्कालीन खर्चाचा समावेश आधीच करून ठेवायला हवा.
प्रवासाचे आधीच बुकिंग हा या प्रक्रियेतील अंत्यत महत्त्वाचा टप्पा आहे. रेल्वे किंवा विमानाचे तिकीट प्रवासाच्या तारखेच्या जितके आधी बुक कराल, तितकी बचत होण्याची शक्यता अधिक असते. रेल्वे प्रवासासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपवर वेळेत तिकीट आरक्षित करावे, जेणेकरून वेटिंग लिस्टचा मनस्ताप टाळता येईल. विमान प्रवासासाठी विविध ॲप्सवर ''प्राइस अलर्ट'' सेट करता येऊ शकतो. शक्यतो इनकॉग्निटो मोड वापरून तिकिटे शोधा, जेणेकरून सर्च हिस्ट्रीमुळे तिकिटांचे दर वाढणार नाहीत. परदेश दौऱ्याच्या अनुषंगाने पासपोर्टची मुदत किमान ६ महिने शिल्लक असल्याची खात्री करावी. आणि व्हिसा प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ हातात ठेवावा.
निवास व्यवस्था निवडताना...
हॉटेल, होम स्टे किंवा रिसॉर्ट निवडताना केवळ आकर्षक छायाचित्रांवर विसंबून न राहता इतर पर्यटकांचे खरेखुरे रिव्ह्यूज आणि रेटिंग्स नक्की वाचा. हॉटेल शहराच्या किंवा मुख्य पर्यटन स्थळांच्या मध्यवर्ती भागात असल्यास स्थानिक प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात. बुकिंग करताना ''फ्री कॅन्सलेशन''चा पर्याय निवडणे केव्हाही फायदेशीर ठरते.
स्थानिक प्रवास, वाहनांचे नियोजन
पर्यटनस्थळी पोहोचल्यानंतर फिरण्यासाठी स्थानिक टॅक्सी, सेल्फ-ड्राइव्ह कार किंवा दुचाकी भाड्याने घेण्याचा पर्याय आधीच तपासून ठेवावे. अनोळखी ठिकाणी स्थानिक गाड्यांचे भाडे अवाजवी असू शकते, त्यामुळे विश्वसनीय ट्रॅव्हल एजन्सी किंवा अधिकृत ॲप्सवरून पूर्वनोंदणी करणे सोयीचे ठरते.
कागदपत्रे आणि डिजिटल तयारी
सर्व प्रवाशांचे ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, तिकिटे आणि हॉटेल व्हाउचर्स यांच्या डिजिटल प्रती सेव्ह करून ठेवा, सोबतच किमान दोन झेरॉक्स प्रती जवळ बाळगा. परदेश प्रवासात ट्रॅव्हल इन्शुरन्स (प्रवास विमा) काढणे अत्यंत गरजेचे आहे.
लवचिक वेळापत्रक
एकाच दिवसात खूप सारी ठिकाणे पाहण्याचा हट्ट धरू नका, त्यामुळे थकवा येतो. महत्त्वाच्या ठिकाणांची यादी करा, तिथल्या स्थानिक वेळा आणि साप्ताहिक सुट्ट्यांची माहिती ठेवा. काही वेळ विश्रांतीसाठी आणि स्थानिक खाद्य संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी राखून ठेवा. थोडक्यात, योग्य वेळेत केलेले ऑनलाइन बुकिंग, पैशांचे नियोजन आणि प्रवासाची पूर्वतयारी यामुळे सहल केवळ स्वस्तच होत नाही, तर कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय आणि आनंददायी बनतो.