
नाशिक : शिवाजी महाराज हेच व्यवस्थापनाचे विश्वगुरू; नितीन बानगुडे-पाटील
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले. सैन्य राजासाठी नव्हे, तर राज्यासाठी ही कृतिशील शिकवण दिली. लष्करी, प्रशासकीय, मनुष्यबळ, लोककल्याण, शेती, ताणतणाव, भावना आणि नियोजन व्यवस्थापन उत्तम पद्धतीने केल्याने शिवाजी महाराज हेच व्यवस्थापन कौशल्याचे विश्वगुरू ठरलेत, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक-लेखक प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी गुरुवारी (ता. १७) येथे केले.
महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचे धडे हॉर्वर्ड, बोस्टन विद्यापीठात गिरविले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि स्वराज्याचे सुराज्य होण्याच्या दिशेने आपण वाटचाल करू या, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीच्या ३३ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त महाकवी कालिदास कलामंदिरात गुरुवारी झालेल्या व्याख्यानात प्रा. बानगुडे-पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य उदाहरणांसह नाशिककरांपुढे ठेवले. ‘सकाळ’चे वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, वृत्तपत्र विक्रेते यांनी फुलून गेलेल्या सभागृहात शिवाजी महाराजांच्या आवडलेल्या पैलूंना टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
प्रा. बानगुडे-पाटील म्हणाले...
‘सकाळ’ने महाराष्ट्राच्या समृद्धीची ‘सकाळ’ होण्यात योगदान दिले. तसेच वैचारिकता, सामाजिकता अन् सांस्कृतिकतेत ‘सकाळ’चा सक्रिय सहभाग राहिला.
स्वराज्याला समुद्रातून धोका असल्याचे ओळखल्याने महाराजांनी स्वतःचे आरमार उभे केले. महाराज नौदलाचे जनक.
दारूगोळा, तोफा, जहाजांच्या निर्मितीचे काम महाराजांनी हाती घेतले होते.
महाराजांकडून आपणाला दूरदृष्टी, सर्जनशीलता, उपक्रमशीलता, नवनिर्मितीचे गुण मिळाले आहेत.
महाराजांनी सात बंदरे उभारली होती. त्यातून वर्षाला दोन बोटी मसाल्याचे पदार्थ घेऊन परदेशात विकायला जात होत्या.
गुलामांचा, माणसांचा व्यापार पोतुर्गीज, इंग्रज आणि डच यांच्यासाठी महत्त्वाचा होता. महाराजांनी माणसाला गुलाम न होण्याची व्यवस्था उभी केली
नऊ वर्षांत ३४४ किल्ले महाराजांनी जिंकले. गडकोटांसाठी पावणेदोन लाख होनांची तरतूद केली होती. स्वराज्यामध्ये ३६० किल्ले होते.
शत्रूला सीमेवर अडविण्याच्या युद्धनीतीचा अवलंब करत कृतिशील कामातून तणावाचे व्यवस्थापन महाराजांनी केले.
औरंगजेब चाल करून आला असताना त्याने पहिला हल्ला चढविला रामशेज किल्ल्यावर. या किल्ल्यासाठी परिसरातील जनता पाच वर्षे लढत राहिली.
औरंगजेबाने चाल केल्यावर मुघल सल्तनत संपविण्यासाठी शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कारणीभूत ठरले होते.
‘सकाळ’च्या विश्वासार्हतेला अन् जबाबदारीच्या भानाला सलाम करायला हवा. कुठल्याही प्रश्नांमध्ये एकांगीपणाऐवजी दुसरी बाजू ‘सकाळ’ वाचकांपुढे ठेवतो हे फार महत्त्वाचे आहे. डिजिटल, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या युगात ‘सकाळ’ने अत्याधुनिकतेचा अवलंब केला आहे. हे वैशिष्ट्य आहे.
-राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक