अहिल्यानगर आवृत्तीसाठी आवश्यक
-----------------------------------------------
स्पर्धेचा लोगो वापरावा (31855)
रंगणार युवा रंगकर्मींचा ‘सकाळ करंडक’
नाशिकमध्ये बुधवारी प्राथमिक फेरी; सहा महाविद्यालयांच्या एकांकिकांचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : महाविद्यालयीन विद्यार्थी कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरलेल्या ‘सकाळ करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची प्राथमिक फेरी बुधवारी (ता. १४) रंगणार आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सकाळी अकरापासून स्पर्धेला सुरुवात होणार असून, उत्तर महाराष्ट्रातील सहा महाविद्यालयांचे संघ एकांकिका सादर करणार आहेत.
मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचा समृद्ध वारसा पुढील पिढीकडे सोपविण्याची जबाबदारी माध्यम समूह म्हणून आपलीही आहे, या भूमिकेतून ‘सकाळ’ने या स्पर्धेचा प्रारंभ केला. अल्पावधीतच या स्पर्धेने लोकप्रियता मिळवली आहे. एकापेक्षा एक सरस एकांकिकांचे सादरीकरण, तरुण कलाकारांची अफाट ऊर्जा आणि अनुभवी ज्येष्ठ परीक्षकांकडून मिळणारे मार्गदर्शन ही या स्पर्धेची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच या स्पर्धेने राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील विविध केंद्रांवर ही स्पर्धा रंगणार आहे. नाशिक, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नागपूर या सहा केंद्रांवर प्राथमिक फेरी होईल. प्रत्येक विभागातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या एकांकिकेची महाअंतिम फेरीसाठी निवड होणार आहे. महाअंतिम फेरीतून स्पर्धेचा ‘महाविजेता’ निश्चित होईल. नाशिक विभागातील विजेत्या संघांना अनुक्रमे दहा हजार आणि सात हजार रुपयांची पारितोषिके, तसेच वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रयोगशील नाट्यप्रयोग अनुभवता यावेत, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कलेला रसिकांची दाद मिळावी, या उद्देशाने स्पर्धेसाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळी अकरापासून सुरू होणाऱ्या स्पर्धेनंतर सायंकाळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.
अशा सादर होतील एकांकिका
- भोसला मिलिटरी महाविद्यालय (नाशिक)- ‘थांब, अजून संपले नाही...!’
- पेमराज सारडा महाविद्यालय (अहिल्यानगर)- ‘बिन रंगाची गोष्ट’
- केटीएचएम महाविद्यालय (नाशिक)- ‘कुक्कलं’
- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (जळगाव)- ‘जेन झी- ए टू झेड’
- पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ( शहादा, जि. नंदुरबार)- ‘फोर्थ अटेम्प्ट’
- लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय (पंचवटी, नाशिक)- ‘पोटुशी’
------