SAKAL Special : पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा, यंदा वाढीव वेळीही नाही! नवीन बदलांची अंमलबजावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam News

SAKAL Special : पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा, यंदा वाढीव वेळीही नाही! नवीन बदलांची अंमलबजावणी

नाशिक : येत्‍या फेब्रुवारी-मार्चमध्ये होत असलेल्‍या इयत्ता दहावी, बारावीच्‍या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झालेले आहे. त्‍यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून आणि दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु होते आहे. यंदाच्‍या वर्षी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा असणार आहे.

तसेच निर्धारित वेळेपेक्षा वाढीव वेळदेखील दिला जाणार नसून, हे बदल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन केले जाते आहे. (SAKAL Special Examination on full syllabus not even at extra time this year Implementation of new changes in education system nashik news)

कोरोना महामारी काळात शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले होते. गेल्‍या दोन वर्षांपासून अध्ययन प्रक्रियेसोबतच परीक्षा पद्धती प्रभावित झालेली आहे. कोरोना महामारीच्‍या कालावधीत थेट परीक्षा रद्द करताना मूल्‍यांकनाच्‍या आधारे दहावी, बारावीचा निकाल जाहीर करण्याची परिस्थिती ओढवलेली होती.

तर फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये झालेल्‍या परीक्षेत अभ्यासक्रमात कपात केलेली होती. विद्यार्थ्यांची लेखनाची सवय प्रभावित झालेली असल्‍याने संपूर्ण प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍न सोडविता यावे, या उद्देशाने वाढीव वेळ दिलेला होता. परंतु आता गेल्‍या काही महिन्‍यांपासून परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पूर्णक्षमतेने वर्ग भरू लागले आहे. काही दिवसांपूर्वी दहावी, बारावीचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केले होते. या संदर्भात हरकती, तक्रारी मागवतांना त्‍या आधारे अंतिम परीक्षा वेळापत्रक नुकतेच शिक्षण मंडळाने जाहीर केलेले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्‍हणजे यावर्षीच्‍या परीक्षेत संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्‍न विचारले जाणार आहेत.

तसेच गुणांनुसार निर्धारित वेळ दिला जाणार असून, वाढीव वेळ यंदा दिला जाणार नसून, या बदलांचा अंदाज घेत विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे. दरम्‍यान प्रात्‍यक्षिक परीक्षा, श्रेणी तोंडी परीक्षा व अन्‍य विषयांच्‍या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: General Post Office : ‘जीपीओ’ कार्यालयाच्या वेळेत बदल अन् अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर

असा आहे परीक्षेचा कालावधी-

इयत्ता बारावी- २१ फेब्रुवारी ते २१ मार्च

इयत्ता दहावी- २ ते २५ मार्च

परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांची नाशिक विभागातील स्‍थिती-

जिल्‍हा बारावी दहावी

नाशिक ७४,७८० ९१,५८०

धुळे २३,८७९ २८,४१०

जळगाव ४७,२१४ ५६,८१७

नंदुरबार १६,७३९ २०,३४१

एकूण १,६२,६१२ १,९७,१४८

"कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्‍या परिस्थितीमध्ये विशेष बाब म्‍हणून परीक्षा संरचनेत बदल केले होते. परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर आलेली असल्‍याने संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच परीक्षेसाठी वाढीव वेळेचीही तरतूद नसेल. विद्यार्थ्यांनी कुठलाही तणाव न घेता व मनात भीती न बाळगता, भयमुक्‍त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे."

- नितीन उपासनी, अध्यक्ष, माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभाग.

हेही वाचा: Jalyukta Shivar- 2 : जलयुक्त शिवार-2 साठी राज्यातील 5 हजार गावांचे लक्ष्य!