धुळे : टुडे पान ४ साठी...
महसूल लोकअदालतीत चार प्रकरणांचा निपटारा
साक्रीत सामंजस्याने वाद मिटल्याने पक्षकारांना मिळाला दिलासा
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. ५ : महसूल विभागातील प्रलंबित वाद परस्पर सामोपचाराने मिटवून नागरिकांना जलद न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ अंतर्गत साक्री तहसील कार्यालयात मंगळवारी (ता. ३) विशेष लोकअदालत झाली. या लोकअदालतीत विविध प्रकरणांवर चर्चा होऊन चार प्रकरणे तडजोडीतून कायमस्वरूपी निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले.
शासनाच्या महसूल व वन विभागाने १४ ऑगस्टला निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. निवासी नायब तहसीलदार किरण कोठावदे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सुनावणीत महसुली दावे, रस्ते, वहिवाटीचे प्रश्न तसेच विविध अर्धन्यायिक प्रकरणांवर प्रामुख्याने चर्चा झाली. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंच्या पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि मध्यस्थीमुळे दोन्ही बाजूंनी परस्पर सहमती दर्शवली.
पक्षकारांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे चार प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड घडवून आणण्यात आली, ज्यामुळे ही प्रकरणे कायमस्वरूपी निकाली निघाली. या लोकअदालतीमुळे संबंधित नागरिकांचा न्यायालयाच्या चकरा मारण्यात जाणारा बहुमूल्य वेळ आणि आर्थिक खर्च वाचण्यास मदत झाली असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.