साक्री-शिर्डी रस्त्याचे काम कासवगतीने ; वाहतुकीवर परिणाम

जीव धोक्यात घालून प्रवास; वाहनधारकांना नुकसानासह अपघातांना तोंड द्यावे लागत आहे
Sakri Shirdi road works Impact on transportation nashik
Sakri Shirdi road works Impact on transportation nashiksakal

वीरगाव : साक्री ते शिर्डी या नवीन निर्माण झालेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय कासवगतीने सुरू असल्यामुळे वाहनधारकांना नुकसानासह अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. आजपर्यंत या रस्त्यावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव या तालुक्यातील शेतीसह मोठे व्यवसाय गुजरात राज्याशी संबंधित असून दळण वळणासाठी सर्वात जवळचा रस्ता हाच असल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र गत दोन ते तीन वर्षापासून या रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय झाली असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

कसमदेना परिसरात कांदा व भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात पिकवली जातात. या उत्पादनास सर्वात मोठी बाजारपेठ गुजरात या राज्यात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी हाच जवळचा मार्ग आहे. मात्र या रस्त्याची परिस्थिती दयनीय झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. राज्यभरात रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जात असून वाहतूक कोंडीचा कायमचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत.

मात्र मुजोर ठेकेदारांनी रस्ते कामाच्या गतीस ब्रेक लावला आहे. साक्री ते शिर्डी या रस्त्यासाठी काँक्रिटीकरण करण्यास भरीव निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. तसेच या रस्त्याच्या कामास वेळ मर्यादा देखील ठरवून देण्यात आली होती. मात्र गुजरात स्थित मुजोर ठेकेदारांनी शासनास ठेंगा दाखवत मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. यातील पिंपळनेर ते सटाणा या ४२ किलोमीटर कामासाठी १९३.१४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामासाठी जानेवारी २०२० मध्ये कार्यारंभ आदेश देखील पारित करण्यात आले आहेत. सदरील काम हे जुलै २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या सर्व आदेशांना धाब्यावर बसवत ठेकेदार मनमानी कारभार करीत असल्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गास मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम लवकर व्हावे, यासाठी आजी- माजी लोक प्रतिनिधींनी अनेकवेळा निवेदने देखील दिली आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण अंतर्गत या रस्त्याचे काम सुरु आहे.

समाविष्ट कामे

  • चार मोठे पूल

  • तेरा लहान पूल

  • एक टोल प्लाझा

  • वीस बस स्टॉप

  • चौतीस जंक्शन

  • दुतर्फा वृक्ष लागवड

  • दहा वर्षे वृक्ष संगोपन

  • पिंपळनेर ते सटाणा रस्ता ४२ किलोमीटर

  • १९३.१४ कोटी निधी

  • जानेवारी २०२० मध्ये कार्यारंभ आदेश

  • जुलै २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश

  • फेब्रुवारी २०२२ पर्यंत काम अपूर्णच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com