(पान ४ ला ॲंकर)
SKR26B02729
साक्री : आठवडे बाजारातील विक्रेत्यांना हलविताना पोलिस आणि नगरपंचायतीचे कर्मचारी.
--------
साक्रीतील आठवडे बाजार अखेर जुन्या जागेवर
पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाच्या मध्यस्तीने निघाला मार्ग
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. १९ : शहरातून जाणाऱ्या नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणारा रविवारचा आठवडे बाजार अखेर जुन्या बाजारपेठेत स्थलांतरित करण्यात आला. नगरपंचायत इमारतीजवळील जुन्या बाजारपेठेत, शनी मंदिर परिसरात रविवारी बाजार भरविण्यात आला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. या निर्णयाबद्दल नागरिकांनी पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाचे कौतुक केले.
साक्री शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. भाजीपाला व फळविक्रेत्यांची दुकाने, हातगाड्या, बेशिस्त पार्किंग आणि बाजारातील गर्दीमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातून अपघातांचा धोकाही वाढला होता. ही समस्या लक्षात घेऊन नगरपंचायतीने आठवडे बाजार जुन्या जागेत भरविण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत नगरपंचायतीने आठवडाभर आधीपासून ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करून विक्रेत्यांना सूचना दिल्या होत्या. रविवारी (ता. १८) उपविभागीय पोलिस अधिकारी ओंकार गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बाजार परिसरात दिवसभर लक्ष ठेवले. ग्रामीण भागातून आलेल्या भाजीविक्रेत्यांसह अन्य दुकानदारांनी महामार्गालगत दुकाने थाटू नयेत, यासाठी पोलिसांनी विक्रेत्यांची समजूत काढली. प्रसंगी कठोर भूमिका घेत त्यांना जुन्या बाजारपेठेत दुकाने लावण्याचे आवाहन केले. प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे महामार्गावरील बाजार हटविण्यात यश आले आणि वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, महामार्गावरील बाजार हटविल्यानंतर तहसील कार्यालयाच्या बाजूने गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला दुकाने लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजी व फळविक्रेत्यांनी प्रशासनाकडे केली. या रस्त्यावर दुकाने लावल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नसल्याचा दावा विक्रेत्यांनी केला. मात्र, प्रशासनाने विक्रेत्यांना जुन्या बाजारपेठेतच दुकाने लावण्याचे आवाहन केले.
--------
बसस्थानक रस्त्यावरील
दुकानांकडे दुर्लक्ष का?
महामार्गावरील आठवडे बाजार हटविण्याच्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले असले, तरी बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. बसस्थानक रस्त्यावर फळविक्रेते आणि अन्य दुकानदारांच्या दुकानांसमोर होणारे बेशिस्त पार्किंग तसेच रस्त्यावरील गर्दीमुळे नियमितपणे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. महामार्गावरील दुकाने हटविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला, मग बसस्थानक रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या दुकानांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल भाजीविक्रेत्यांनी उपस्थित केला.