विस्तार अधिकारी समायोजनाचा प्रश्न ऐरणीवर
वेतन न मिळाल्यास उद्यापासून आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत विस्तार अधिकारी (सांख्यिकी) यांचे वेतन रखडले आहे. त्यांना त्वरित वेतन न मिळाल्यास गुरुवार (ता.२२) पासून आंदोलनाचा इशारा राज्य जिल्हा परिषद विस्तार अधिकारी सांख्यिकी संघटनेने दिला आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या सुधारित आकृतिबंधाबाबत विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संवर्गाचे पद व्यपगत करण्यात आले. सध्या राज्यातील जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभाग तसेच सर्व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांमध्ये हे अधिकारी कार्यरत असून योजनेच्या अंमलबजावणीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ऐन दसरा-दिवाळीच्या सणाच्या काळात वेतन न मिळाल्याने दैनंदिन खर्च तसेच हप्ते भरण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सांख्यिकी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप बिरारी, जिल्हाध्यक्ष संजय परदेशी, जिल्हा सचिव संदीप चौधरी, विजय पचलोरे, अनिल जऱ्हाड, योगेश भोये, सचिन आहिरे, दादासाहेब आहिरे, प्रवीण संधान, मेघा आहिरे आणि तेजल मराठे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना निवेदन दिले.