स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर शिवसेनेचे भवितव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse and Suhas Kande

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले असून, नाशिक जिल्ह्यातील दोन नेते कृषी मंत्री दादा भुसे व आमदार सुहास कांदे त्यात सहभागी आहेत.

स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर शिवसेनेचे भवितव्य

नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पक्षाची संघटना बांधणी बळकट आहे. आगामी निवडणुकांमधील पक्षाच्या कामगिरीवर आणि स्थानिक नेत्यांच्या प्रभावातूनच पक्षाची पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट होईल.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले असून, जिल्ह्यातील दोन नेते कृषी मंत्री दादा भुसे व आमदार सुहास कांदे त्यात सहभागी आहेत. या बंडामुळे भविष्यात भुसे आणि कांदे यांच्या मतदारसंघात त्यांची प्रभावी रिप्लेसमेंट होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पक्ष म्हणून शिवसेना हा ब्रँड कणखर झाला तरी, नव्या दमाने पुढे जाण्याचे आव्हान कायम असेल.

नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे पंधरा मतदारसंघ आहेत. यातील निफाड, सिन्नर, देवळाली, इगतपुरी, दिंडोरी, नांदगाव, येवला, नाशिक पश्चिम, पूर्व व मध्य या दहा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे प्रभावी अस्तित्व आहे. आगामी काळात दमदार स्थानिक नेत्यांमुळे शिवसेना ब्रँड म्हणून जिल्ह्यात टिकून राहील. नव्या नेतृत्वाला संधी मिळेल. परंतु हा ब्रँड पूर्वीसारखा कणखर राहील का? हे मात्र आगामी काळातील घडामोडींवर ठरेल.

भुसेंचा मार्ग कठीण

मालेगाव बाह्य मतदारसंघात पक्षांऐवजी हिरे आणि भुसे हे गट प्रभावी आहेत. यात, या टर्ममध्ये भुसे यांना कृषी मंत्री म्हणून फारशी प्रभावी प्रतिमा निर्माण करता आली नव्हती. मतदारसंघात त्यांचेच सहकारी, बाराबलुतेदार मंडळाचे अध्यक्ष बंडूकाका बच्छाव यांच्याकडे भुसेंना पर्याय म्हणून पाहिले जाते. हिरे गटाचा देखील बच्छाव यांना छुपा पाठिंबा आहे. आता भुसे यांच्या बंडाने बच्छाव यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव मतदारसंघात स्वतःची यंत्रणा उभी केली होती. बंडामुळे यापुढे शिवसेना त्यांच्या सोबत नसेल. भविष्यात त्यांना आपली वेगळी प्रतिमा तयार करावी लागेल. या सर्व घडामोडींत गणेश धात्रक शिवसेनेत त्यांची जागा घेतील, असे चित्र आहे. गेली दोन वर्षे कांदे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी पंगा घेऊन त्यांची कोंडी केली होती. बंडामुळे आता पंकज भुजबळ यांचा मार्ग मोकळा होईल.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नाशिकच्या राजकारणात सर्वच पक्षांत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. विशेषतः शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत चीड होती. शिंदेंच्या समर्थनासाठी फलक लावले गेले. मात्र शिवसेनेच्या महिलांनी हा फलक दुसऱ्याच दिवशी फाडला. तेव्हा मात्र हे फलक लावणारे पळून गेले होते. शिंदे यांच्या विरोधात प्रखर आंदोलन झाले. अशाच प्रतिक्रिया ग्रामीण भागातही उमटल्या. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमुळे कोणीही शिंदे यांच्या गटात जाण्याचे धाडस करेल, याची शक्यता कमीच आहे. जे गेले त्यांनी जी भूमिका मांडली आहे, ती पाहता त्यांना भाजपचे दार ठोठवावे लागतील. मात्र तिथे आधीच आसने फुल्ल असल्याने भाजप त्यांचे कसे स्वागत करेल, हाही प्रश्नच आहे.

स्थानिक नेत्यांची भूमिका महत्त्वाची

नाशिक शहरात उपनेते बबनराव घोलप, सुनील बागूल, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, महापालिका गटनेते अजय बोरस्ते तर ग्रामीण भागात विजय करंजकर, माजी आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, भास्करराव बनकर, निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ, संभाजी पवार, धनराज महाले, गणेश धात्रक असे प्रत्येक विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे अस्तित्व राखण्याची जबाबदारी या नेत्यांच्या शिरावर आहे. त्यामुळे आगामी काळातील त्यांचीही भूमिका स्थानिक शिवसेनेच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सद्यःस्थिती

  • नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी दहा मतदारसंघात शिवसेना प्रभावी

  • मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये बंडूकाका बच्छाव दादा भुसे यांना प्रभावी पर्याय

  • नांदगाव मतदारसंघात गणेश धात्रक ठरू शकतात सुहास कांदेंना पर्यायी

  • सुहास कांदेंना छगन भुजबळांशी घेतलेला पंगा भोवणार, पंकज भुजबळांना संधी

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल शिवसेनेचे खरे अस्तित्व

Web Title: Sampat Devgire Nashik Shivsena Politics Mla Rebel Eknath Shinde Uddhav Thackeray Maharashtra Dada Bhuse Suhas Kande Future

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..