दुष्काळावर मात करण्यासाठी
‘समृद्ध पंचायत राज अभियान’
मंत्री गोरे : जलसंधारण, पाणी बचत आणि रोजगारनिर्मितीवर भर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१० : गावांचा सर्वांगीण विकास साधतानाच संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, पाणी बचत आणि रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२६-२७’ राबविण्यात येत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (ता. ११) अभियानाचा शुभारंभ होणार आहे. या निमित्ताने ‘सरपंच परिसंवाद’ आयोजित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार उपस्थित होते.
गोरे म्हणाले, ‘अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच हजार ५०० गावांनी सहभाग घेतला. या गावांमध्ये तीन हजार ७४६ किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले, तर ६९ लाख आयुष्मान भारत कार्डांचे वितरण करण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजनांवर विचारमंथन केले जाणार आहे.’
पाणी साठवण, काटकसरीने वापर, ठिबक सिंचन आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे, चारा लागवड आणि चारा वितरणाच्या प्रश्नांवरही लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा परिषदेतील कथित बोगस दिव्यांग भरतीप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचा इशाराही गोरे यांनी दिला.
प्रथम क्रमांकाच्या गावाला पाच कोटी
अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या गावाला पाच कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या गावांचाही गौरव केला जाईल. याच धर्तीवर विकसित गावांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रत्येकी तीन जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.