फोटो : H32640
---------
सफाई कामगारांचे
महापालिकेसमोर धरणे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : वॉटरग्रेस कंपनीने बडतर्फ केलेल्या २०० कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे, सफाई कंत्राटी पद्धत बंद करून सर्व कामगारांना मानधनावर सेवेत रुजू करावे या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. १६) महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कामगारांनी म्हटले आहे की, गेल्या ४ वर्षांपासून कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करत होतो, मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. महापालिकेविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करूनही त्याला २०२६ च्या नवीन टेंडर प्रक्रियेत पुन्हा सामावून घेण्यात आले. मालेगाव महापालिकेने त्याचा ठेका रद्द केला होता. पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. सफाई कंत्राटी ठेक्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून घनकचरा व्यवस्थापक अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून या प्रकरणाची त्वरित चौकशी करावी. कंत्राटी सफाई ठेका रद्द करावा, गेल्या चार वर्षांपासून कामावर येण्यास मज्जाव केलेल्या २०० कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे. कंत्राटी सफाई ठेका पद्धत बंद करून सर्व कंत्राटी सफाई कामगारांना मानधनावर घेण्यात यावे. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला. आंदोलनात धीरेंद्र आहिरे, विशाल आढाव, लतेश सोनवणे, विशाल साळवे, हेमंत काळे, सविता बोडके, असिफ कादरी, मिजान पठाण, संदीप धामणे, स्वाती दोंदे, अमोल जाधव आदी सहभागी झाले होते.
------------