NSK26H34605
जळगाव : बैठकीत बोलताना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्य रवी कलोसे. व्यासपीठावर उपस्थित महापौर दीपमाला काळे, पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उपमहापौर मनोज चौधरी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर.
...........
सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्य रवी रामू कलोसेंचा मनपात आढावा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. गटार व मलनिस्सारण वाहिन्यांची स्वच्छता करताना मानवी हस्तक्षेप टाळून यांत्रिकी पद्धतीचा वापर वाढवावा. कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने, आरोग्य सुविधा आणि सामाजिक संरक्षण मिळते की नाही, याची प्रशासनाने खात्री करावी, अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी रामू कलोसे यांनी गुरुवारी (ता. ५) महापालिका प्रशासनाला दिल्या.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी महापालिकेला भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी महापौर दीपमाला काळे, पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, उपायुक्त धनश्री शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन, आरोग्यविषयक सुविधा, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा, निवृत्तीवेतन आणि अन्य प्रलंबित लाभांचा आढावा घेण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान राखण्याबरोबरच त्यांचे आर्थिक व सामाजिक प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.