प्रेमप्रकरणातून सापगावला युवकाचा खून
एकाला अटक, बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे रागातून कृत्य
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.७ : बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून एका अठरा वर्षीय तरुणाची धारदार चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सापगाव (ता. त्र्यंबकेश्वर) ते फेरी मार्ग रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ गुरुवारी (ता. ५) रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. संशयिताला अटक करण्यात आली असून, त्र्यंबकेश्वर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्यन सोमनाथ कांबळे (१८, रा. सापगाव, ता. त्र्यंबकेश्वर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. संशयित आदित्य एकनाथ मोंढे (२०, रा. शिरसगाव, ता. त्र्यंबकेश्वर) याच्याविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत आर्यन कांबळे याचे संशयित आदित्य मोंढे याच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. आर्यन गुरुवारी (ता. ५) सायंकाळपासून घरी न परतल्याने त्याचे नातेवाईक त्याला शोधत होते. दरम्यान, संशयित आदित्य मोंढे हा त्याला दुचाकीवरून घेऊन गेल्याचे समजल्यावर नातेवाइकांनी सापगाव फाटा ते फेरी मार्गाकडे शोध सुरू केला. स्मशानभूमीजवळ आर्यन दुचाकीवर बसलेला आढळला. आदित्यने आपल्याला येथे आणून मारहाण केली असून मोबाईलही काढून घेतल्याचे आर्यनने सांगितले. नातेवाइकांनी आदित्यला बोलावून घेतले व वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. ‘मी आर्यनला एकट्यात नेऊन समजावून सांगतो’ असे सांगून आदित्य आर्यनच्या खांद्यावर हात ठेवून त्याला ५० ते ६० मीटर अंतरावर घेऊन गेला. काही वेळातच आर्यनचा मोठ्याने आवाज आला. नातेवाइकांनी धाव घेतली असता आर्यन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आदित्यने धारदार चाकूने आर्यनच्या छातीवर, गळ्यावर, हातावर व पोटाच्या डाव्या बाजूला वार केले होते. आदित्यने आर्यनचा मोबाईल रस्त्यावर आपटून फोडला आणि ‘मला जे करायचे होते ते मी केले आहे’ अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.
नातेवाइकांनी आर्यनला तातडीने त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर आर्यनचा चुलतभाऊ रोशन पप्पू कांबळे (२३) याने त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य मोंढे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.