सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव, कोजागिरीची निर्विघ्न सांगता वाहतूक नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शन; गर्दी तुलनेने कमी राहिल्याने व्यापाऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम

सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव, कोजागिरीची निर्विघ्न सांगता वाहतूक नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शन; गर्दी तुलनेने कमी राहिल्याने व्यापाऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम
Published on: 
पान दोन मेन 13391 सप्तशृंग गड : आदिमायेची सेवा करणारे पुरोहित. सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव, कोजागरीची निर्विघ्न सांगता पोलिस प्रशासनाकडून वाहतूक नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शन दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २८ : श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमा उत्सवाची मंगळवारी (ता. २७) शांततेत व निर्विघ्न वातावरणात सांगता झाली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासाठी रंगीत तालीम ठरलेल्या या दोन्ही उत्सवात ट्रस्ट व ग्रामपंचायतीचे चोख नियोजन, पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियोजन, आरोग्य सुविधा, वीजपुरवठा आणि भाविकांच्या दर्शन व्यवस्थेवर भर देण्यात आला. मात्र, गतवर्षांच्या तुलनेत कावडधारकांची संख्या घटल्याने आणि एकूण गर्दी तुलनेने कमी राहिल्याने गडावरील काही व्यावसायिकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला. सप्तशृंगी गडावर ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव, तर २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान कोजागिरी पौर्णिमा उत्सव आणि कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कार्यालयात मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या उपस्थितीत पुरोहितांनी विधिवत शांतिपाठ केला. मुख्य पुजारी घनशाम दीक्षित, पुरोहित श्रीकांत दीक्षित, शेखर देशमुख, मिलिंद दीक्षित, भागेश दीक्षित, चैतन्य दीक्षित आदींच्या मंत्रोच्चारात पूजा विधी पार पडला. आदिमायेला दुधाचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर शांतिपाठाने उत्सवाची सांगता झाली. यानंतर ग्रामस्थ व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. धार्मिक उत्साह, भाविकांची श्रद्धा आणि प्रशासनाच्या समन्वयातून दोन्ही उत्सवांची निर्विघ्न सांगता झाली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव आणि कोजागिरी उत्सवाकडे प्रशासनाची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. त्यादृष्टीने विविध विभागांनी केलेल्या नियोजनाची चाचणी या उत्सवात झाली. ---- वाहतुकीचे योग्य नियोजन नवरात्रोत्सवाच्या दोन दिवस आधीपासूनच गडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्यामुळे गडावरील वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि त्यातून भाविकांना होणारा त्रास टाळण्यास मदत झाली. नांदुरी घाट परिसरात पार्किंग व्यवस्था, वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण आणि व्हीआयपी वाहनांवरील निर्बंध यांमुळे गडावरील वाहतूक तुलनेने सुरळीत राहिली. भाविकांच्या निवाऱ्यासाठी उभारलेले डोम, ऊन आणि पावसापासून संरक्षणासाठी उभारलेले मंडप तसेच दर्शन मार्गावरील बॅरिकेडिंगमुळे गर्दीचे नियोजन करण्यात आले. दर्शनासाठी होणारी लोटालोटी आणि संभाव्य चेंगराचेंगरी टाळण्याच्या दृष्टीने प्रशासनाने खबरदारी घेतली. पोलिस बंदोबस्त, आरोग्य सुविधा आणि चोवीस तास वीजपुरवठा यांसारख्या व्यवस्थाही सज्ज ठेवण्यात आल्या. त्यामुळे मोठ्या धार्मिक उत्सवातही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास प्रशासनाला यश आले. ---------------- व्यापाऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही नवरात्रोत्सव आणि कोजागिरी उत्सवासाठी भाविकांची उपस्थिती समाधानकारक राहिली. मात्र, कावडधारकांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र होते. पदयात्रेकरूंचे प्रमाण कायम असताना शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांमुळे कोजागरीदरम्यान भाविकांची गर्दी वाढली. त्यामुळे गडावरील व्यावसायिक आणि राज्य परिवहन महामंडळाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. तथापि, नवरात्रोत्सवात अपेक्षित गर्दी न झाल्याने फुले, प्रसाद, पूजासाहित्य, खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या काही व्यावसायिकांच्या उत्पन्नावर काहीसा परिणाम झाला. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com