सप्तशृंगगड सज्जतेच्या दिशेने...
लीड
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर भाविकांच्या स्वागतासाठी सज्जतेच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. सिंहस्थासाठी मोठ्या संख्येने भाविक सप्तशृंगी निवासिनी देवीच्या दर्शनासाठी गडावर येण्याची शक्यता आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड ग्रामपंचायत, राज्य परिवहन महामंडळ, पोलिस प्रशासन आणि विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून सुविधांचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. रस्ते विकासाची कामे, दर्शन व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, आरोग्यसेवा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि निवासव्यवस्थेच्या माध्यमातून गडावरील यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.
- दिगंबर पाटोळे, वणी (नाशिक)
---------------------------
नां दुरी ते सप्तशृंगगड हा सुमारे १० किलोमीटरचा घाटरस्ता गडावरील दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काँक्रिटीकरण, तीव्र वळणांची सुधारणा आणि सुरक्षित वाहतुकीसाठी कामे हाती घेतली आहेत. ही सर्व कामे पूर्णत्वाच्या दिशेने असून, काही कामे सुरू आहेत. सिंहस्थातील वाहतूक निर्बंध आणि बससेवेचे अंतिम वेळापत्रक संबंधित प्रशासनाच्या निर्णयानुसार निश्चित होईल. सुसज्ज बसस्थानकासाठी १५ कोटींचा निधी मंजूर आहे; परंतु जागा निश्चितीसाठी अजून परवानगी नसल्याने कामास प्रारंभ होऊ शकलेला नाही. नवरात्रोत्सवाच्या काळात गडावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपलब्ध नियोजनानुसार, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दीड हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त, तसेच विविध ठिकाणी ३११ सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख ठेवण्याची व्यवस्था केली होती. सिंहस्थाच्या काळातही गर्दीच्या प्रमाणानुसार पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण पथके, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सक्षम ठेवावी लागणार आहे.
--
मार्ग स्वतंत्र ठेवण्याचे नियोजन
भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे, यासाठी मंदिरात प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग स्वतंत्र ठेवण्याचे नियोजन आहे. मंदिर २४ तास खुले ठेवण्याची तरतूद प्रस्तावित व्यवस्थेत नमूद आहे. दर्शनरांगेच्या शिस्तबद्ध नियमनासाठी १५ बाऱ्यांचे नियोजन असून, प्रत्येक बारीवर सुरक्षारक्षक, मंदिर कर्मचारी आणि पोलिसांची नियुक्ती केली जाईल. मुख्य प्रवेशद्वार, पहिली पायरी आणि दसरा टप्प्यावरील दत्तमंदिराजवळ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टरची व्यवस्था असून, सुरक्षारक्षकांना १२ हॅन्ड मेटल डिटेक्टर देण्यात आले आहेत. गर्दीच्या वेळी दर्शनरांगा, पायी जाणारे भाविक, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग भाविक यांच्यासाठी स्वतंत्र मदतव्यवस्था महत्त्वाची ठरेल. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मार्ग मोकळे ठेवण्याची आवश्यकता आहे.
---
रुग्णवाहिकांची व्यवस्था
नवरात्रोत्सवात आरोग्य विभागामार्फत ४२ वैद्यकीय अधिकारी, ८० आरोग्य कर्मचारी, सहा फिरती वैद्यकीय पथके आणि सहा रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून प्रत्येकी दोन हजार लिटर क्षमतेच्या १२ टाक्या, सहा हजार लिटर क्षमतेची एक टाकी आणि वॉटर कूलरची सुविधा उपलब्ध करण्यात आली. भक्तनिवास परिसरात आठ लाख लिटर क्षमतेच्या पाणीसाठवण टाक्यांची व्यवस्था आहे. स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी आणि फिरती अशी मिळून १०० स्वच्छतागृहे उपलब्ध असून, ५० सफाई कर्मचाऱ्यांमार्फत परिसर स्वच्छ ठेवण्याचे नियोजन आहे. ट्रस्टच्या विविध भक्तनिवासांमध्ये एकूण २१६ खोल्या उपलब्ध असल्याची माहिती आहे.
---
विकास आराखड्यांतर्गत विकासकामे
राज्य शासनाने सप्तशृंगगड विकासासाठी ८१ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांचा निधी मंजूर असून, या निधीतून नांदुरी येथील भक्तनिवास आठ कोटी ५१ लाख, गडावरील पोलिस ठाणे सात कोटी ७१ लाख, नांदुरी बसस्थानक पाच कोटी ५० लाख
वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी पाच कोटी ४४ लाख, भूमिगत रस्ते व सिमेंंट रस्ते यासाठी चार कोटी ६० लाख, वनजमिनीवरील विविध कामांसाठी चार कोटी ३८ लाख रुपये, मंदिर पहिली पायरी मार्गावर डोमसाठी तीन कोटी ९२ लाख, नक्षत्र बगीचा उभारणीसाठी एक कोटी ९४ लाख, घाट रस्त्यावरील दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी एक कोटी ९२ लाख, तर स्वच्छतागृहासाठी एक कोटी ५२ लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे. यातील बहुतांश कामे पूर्णत्वास, तर काही कामे प्रगतिपथावर आहेत.