सप्तशृंगगडावरील वाहन पासचा तिढा सुटला
कळवण, ता. ९ ः शारदीय नवरात्रोत्सवात सप्तश्रृंगगडावरील वाद अखेर रात्री उशिरा मिटला. आमदार नितीन पवार यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्थानिक नागरिकांना आधार कार्डवर आणि विशेष पासवर गडावर प्रवेश देण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी शनिवारी (ता. १०) पुकारलेला गाव बंद आणि यात्रेवर बहिष्काराचा निर्णय मागे घेतला आहे. नवरात्र काळात सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने यंदा स्थानिक व्यावसायिक, मालवाहतूकदार, विद्यार्थी आणि देवीची महापूजा करणाऱ्या मानकरी कुटुंबालाही वाहन पास नाकारला होता. दरवर्षी त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीच्या धर्तीवर घाट रस्ता बंद असताना ग्रामपंचायतीच्या शिफारशीने स्थानिकांना आधार कार्डवर सोडले जात होते, यंदा ती सोय बंद केल्याने ३ ते ४ हजार ग्रामस्थ आक्रमक झाले होते. शुक्रवारी रात्री भवानी चौकात बैठक घेऊन आधार कार्ड दाखवून गाडी सोडा अशी एकमुखी मागणी करत शनिवारी गाव बंदची हाक देण्यात आली होती. रात्री उशिरा यावर तोडगा निघाला. आमदार पवार यांना आम्ही अर्ध्या तासापूर्वी गावाची समस्या सांगितली. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी यांना फोनद्वारे कळवले आणि पाऊण तासातच त्याचे पूर्ण समाधान केले. उपसरपंच संदीप बेनके, व्यापारी संघाचे अध्यक्ष अजय दुबे, माजी सरपंच राजेश गवळी, अमर कोकाटे, साई बेनके, वैभव ढुमसे, लखन परदेशी, साईराम शिंदे, गणेश शिरसाठ, दिपक जोरवर, पप्पू शिवदे, गुलशन गवळी, राहुल पोटे, भूषण गवळी, पप्पू पवार, योगेश कदम आदी. _____________________