धार्मिक पर्यटन
फोटो : NSK26H32431 (एकमुखी दत्त प्रभू मंदिर)
फोटो : NSK26H32430 (चेतक महोत्सव)
फोटो : NSK26H32032 प्रा. दत्ता वाघ पासपोर्ट)
चेतक फेस्टिवलमुळे जगभर ख्याती
----------------------------
सारंगखेड्यातील एकमुखी दत्त मंदिर
सारंगखेडा येथे महानुभाव पंथाचे एकमुखी प्रभू श्री दत्ताचे पवित्र स्थान आहे. मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. येथे दरवर्षी मार्गशिर्ष पौर्णिमेला श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य यात्रा भरते. त्यानिमित्ताने भरणाऱ्या अश्व बाजाराला सुमारे चारशे वर्षाची परंपरा लाभली आहे. चेतक फेस्टिवलमुळे हा अश्वबाजार आता जगविख्यात झाला आहे.
- प्रा.दत्ता वाघ, शहादा
पूर्वी येथील दत्त प्रभूंचे मंदिर अत्यंत साधे कौलारू आणि छताच्या घरात होते. कालांतराने सारंगखेडा येथील पूर्वीच्या मंदिर समितीने एकत्र येऊन मंदिराचा जिर्णोद्धार केला. नव्याने सुंदर मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर महानुभाव पंथाच्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी सारंगखेडा यात्रोत्सवाला दरवर्षी देशभराच्या कानाकोपऱ्यातून भाविक लाखोंच्या संख्येने येतात. इतर काळातही मोठ्या संख्येने भाविकांची वर्दळ असते. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांब लांब रांगा लागत असतात. येथील श्री प्रभू दत्त हे नवसाला पावतात, अशी ख्याती असून अनेक भाविक विविध प्रकारचे नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. दत्त जयंतीला मंदिर परिसरात विविध प्रकारच्या तुला करून भाविक आपले नवस फेडतात. पेढे, केळी, साखर, गुळ, नाण्यांची चिल्लर, पैसे विविध प्रकारची फळे यांची तुला केली जाते. यावेळी नवस फेडणारा एका पारड्यात बसतो तर दुसऱ्या पारड्यात ज्याची तुला मानलेली असते तो पदार्थ टाकला जातो.
दत्त प्रभूंच्या जयंतीपासून सुरू होणारी सारंगखेडा यात्रा सुमारे पंधरा दिवस ऐनभरात असते. ही यात्रा शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी ठरते. यात्रेत कृषी उपयोगी सर्व प्रकारची औजारे आणि साहित्य खरेदी केली जातात. यात्रेत गरम मसाल्यापासून सर्व प्रकारचे पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. याशिवाय विविध खेळणी, संसारोपयोगी साहित्य, भांडी, लाकडी वस्तु सर्व काही उपलब्ध असते. खवय्यांसाठी उपाहारगृहे चोवीस तास खुली असतात.
जगप्रसिद्ध अश्वबाजार
सारंगखेडा येथील अश्व बाजाराला आता वैश्विक स्वरूप प्राप्त झाले आहे. याचे सर्व श्रेय प्रामुख्याने तेथील नेतृत्व जयपालसिंग रावल यांना जाते. यात्रेला आणि अश्वबाजाराला चारशे वर्षाची परंपरा असली तरी सुमारे दहा वर्षांपासून अश्व बाजाराचे रुपडे पूर्णपणे बदलले आहे. जुने जाणकार लोक असे म्हणतात की, पूर्वी अश्व बाजारात अफगाणिस्तानहून विक्रीसाठी घोडे येत असत. मोगल काळात यात्रेत मोगलांकडून घोड्यांची खरेदी केली जायची. आजही येथील अश्व बाजारासाठी गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यातून घोडे विक्रीसाठी येत असतात. यात्रा काळात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. विद्यमान विपणन मंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सारंगखेडा यात्रेला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी पावलं उचलली आणि यासाठी शासकीय निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या पर्यटन क्षेत्राला फारसा निधी मिळू शकला नाही. चेतक महोत्सवानिमित्त नामवंत कलाकारांना निमंत्रित केले जाते. चेतक महोत्सवाला जपान, रशिया, अमेरिका, नेपाळ, चीन आदि देशातील पर्यटकांनी आतापर्यंत भेट दिलेली आहे. या महोत्सवाला आणि यात्रेला आता राष्ट्रीय पर्यटनाचा दर्जा देण्याची गरज आहे. शासनाने सारंगखेडा क्षेत्र कायमस्वरूपी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित केल्यास या भागातील रोजगार निर्मितीत वाढ होईल.