फोटो : NSK26H34138
नंदुरबार : सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजित कार्यकमास उपस्थित प्राचार्य पराग पोळ समवेत सबस्टीन जयकर, अमोश डलगे, फरहाना शेख.
--------
नंदुरबारला सरदार पटेल यांना अभिवादन
जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २ : शहर व जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा- महाविद्यालयात प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
-------
एस. ए. मिशन हायस्कूल
नंदुरबार : एस. ए. मिशन ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पटेल यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य पराग पोळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सबस्टीन जयकर, सांस्कृतिक विभागप्रमुख अमोश डलगे, शिक्षिका फरहाना शेख उपस्थित होते. प्राचार्य पोळ यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली. शिक्षिका रिटा गावित यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी लघुनाटिका सादर केली. यानिमित्त स्केच रेखाटन, व्यक्तिचित्र आणि फलकनिर्मिती उपक्रम घेण्यात आला. प्रश्नमंजुषा, कथाकथन स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांनी फिट इंडिया रनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. व्हाइस प्रीफेक्ट अजिंक्य सोनवणे, तेजस मोरे यांनी सूत्रसंचालन केले. फलक लेखनासाठी जगदीश पाटील यांचे सहकार्य लाभले. तेजस मोरे यांनी आभार मानले.
---------------------
फोटो : NSK26H34202
नंदुरबार : प्रतिमापूजनप्रसंगी उपस्थित युवराज पाटील, रवींद्र पाटील आदी.
---------
राजे शिवाजी विद्यालय
नंदुरबार : श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित राजे शिवाजी विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. नंदुरबार जिल्हा संचालक संघटनेचे सचिव युवराज पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी त्यांनी महापुरूषांच्या कार्याला उजाळा दिला. शिक्षिका शारदा पवार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी, तर विभावरी बोरसे यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. मुख्याध्यापक रवींद्र पाटील व शिक्षक उपस्थित होते.
-----
फोटो : NSK26H34141
जीटीपी महाविद्यालय
नंदुरबार : प्रतिमापूजन करताना प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी. शेजारी डॉ. उपेंद्र धगधगे व मान्यवर.
नंदुरबार : येथील जी. टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी प्रतिमपूजन केले. डॉ. रघुवंशी यांनी सरदार पटेल यांच्या अखंड भारताच्या निर्मितीतील योगदान, तर इंदिरा गांधी यांच्या राष्ट्रनिर्मितीतील नेतृत्वाचे महत्त्व सांगितले. जयंती उत्सव समितीचे समन्वयक डॉ. उपेंद्र धगधगे यांनी सरदार पटेल यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. संयोजन डॉ. मनोज शेवाळे, प्रा. हर्षबोध बैसाणे यांनी केले.
-----------
के. डी. गावित विद्यालय
पिंपळोद : येथील के. डी. गावित माध्यमिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात वातावरणात साजरी झाली.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सरदार पटेल यांच्या जीवनकार्याची, स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची तसेच भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.