मेनफिचर
जिल्हा टुडे पान दोनसाठी
---------------------
BSW26B12188 व BSW26B12187
भुसावळ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी आयोजित शोभायात्रेच्या उद् घाटनप्रसंगी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे. सोबत प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, रजनी सावकारे, डॉ. केतकी पाटील, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, उमेश नेमाडे आदी. दुसऱ्या छायाचित्रात शोभायात्रेत सहभागी वारकरी व टाळकरी.
-----------------
भुसावळात वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आदर्श शोभायात्रा
-----
पारंपरिक वाद्यांचा वापर; सकल लेवा समाजाचा उपक्रम, डीजेचा वापर टाळला
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. ३१ : येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता.३१) सकाळी शिस्तबद्ध व आदर्श शोभायात्रा सकल लेवा समाजातर्फे काढण्यात आली. यात डीजेचा वापर न करता पारंपरिक सनई चौघडे व टाळमृदंग यांचा वापर करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेतील ही मिरवणूक लोक आवर्जुन थांबून पाहात होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण होते. सकल लेवा समाज उत्सव समितीने आयोजित केलेल्या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिराजवळ लोक जमण्यास सुरवात झाली होती. यात सजवलेली बैलगाडी सर्वांत पुढे होती. शहरासह तालुक्यातील विविध भागांतून वारकरी, कीर्तनकार, टाळकरी मोठ्या संख्येने आले होते. टाळमृदुंगाच्या तालावर अभंग, हरीपाठ आदी सादर करीत होते. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
संजीव देखावे लक्षवेधक
शोभायात्रेत संजीव देखावे होते. यात हर्षल बऱ्हाटे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची, तर नीलिमा भोळे-झोपे यांनी बहिणाबाईंची वेशभूषा केली होती. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेची सुरुवात झाली. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, उमेश नेमाडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, डॉ. केतकी पाटील, मंगला पाटील आदी उपस्थित होते. शोभायात्रा जामनेर रोड, अग्रेसन चौक, विठ्ठल मंदिर वॉर्ड, बाजारपेठ पोलिस ठाणे, लोखंडी पुल, हंबर्डीकर बेकरी, वसंत टॉकीज, मुनिसिपल पार्क यामार्गे जाऊन सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ शोभायात्रेचा समारोप झाला.
यांची विशेष उपस्थिती
या शोभायात्रेत बेळी संस्थानचे गादीपती ह.भ.प. भरत महाराज, दिनकर महाराज, किशोर महाराज, गुरव महाराज, सुरेश महाराज, स्वामीनारायण पंथाचे मुक्ती स्वामी, गोपाल भगत, महानुभाव पंथाचे मानेकर बाबा यांची विशेष उपस्थिती होती. शहरातील डॉक्टर, वकील, अभियंता, शेतकरी, विविध व्यावसायिक डोक्यावर गांधी टोपी परिधान करून मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते.