पान दोन मेन
--------------------
06955
सटाणा : मार्गावरील ४५ ठिकाणचे दुभाजक बंद केल्याने सुरू झालेली सुरक्षित वाहतूक.
पान एक
-----------------
सटाणा ते ठेंगोडा महामार्गावरील ४५ ‘दुभाजक’ बंद;
अपघातांचा धोका टळल्याने नागरिकांमधून सुटकेचा श्वास
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. ६ : शहरातील साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा ते ठेंगोडा दरम्यानच्या आठ किलोमीटर अंतरात तब्बल ४५ ठिकाणी खंडित असलेले दुभाजक बंद करण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला.
सटाणा ते ठेंगोडा या आठ किलोमीटरच्या टप्प्यात खासगी शाळा, होटेल्स, धाबे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना तसेच शेतात जाण्यासाठी ठिकठिकाणी डिव्हायडर तोडण्यात आले होते. तब्बल ४५ ठिकाणी दुभाजक खंडित असल्यामुळे वाहनचालकांकडून मधला मार्ग म्हणून सर्रास वापर केला जात होता. महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर अचानक दुसरी वाहने आल्याने वारंवार अपघातांना निमंत्रण मिळत होते. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खंडित मार्ग वाहनचालकांच्या लक्षात न आल्यामुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनली होती.
या आंदोलनात संदीप भामरे, तुषार वाघ, दिगंबर सोनवणे, अशोक भामरे, आर. टी. सोनवणे, रणधीर मोरे, दादाजी खैरनार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
------
राष्ट्रवादीच्या गांधीगिरी आंदोलनाला यश
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑक्टोबरला ''गांधीगिरी'' आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान खंडित दुभाजकाच्या ठिकाणी फलक लावून अनधिकृत वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या पाठपुराव्याची दखल घेत महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी परमेश्वर सुतार यांच्याशी चर्चा करून तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात आली. तसेच कामासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त मिळण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक योगेश पाटील आणि बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांच्याशीही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर प्रशासनाच्या समन्वयातून गुरुवारपासून (ता. ५) महामार्ग प्राधिकरणाने हे खंडित दुभाजक बंद करण्याचे काम प्रत्यक्ष सुरू केले आहे.
----------
‘सकाळ’चा पाठपुरावा
सटाणा ते ठेंगोडा दरम्यानच्या आठ किलोमीटर अंतरात तब्बल ४५ दुभाजक होती. ही सर्व दुभाजक बंद करण्यात यावी. मार्गावरील वाहतूक सुरळित व सुरक्षित व्हावी यासाठी ‘सकाळ’ने देखील वृत्त प्रसिद्ध करत पाठपुरावा केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गांधीगिरी आंदोलनाची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुभाजक बंद करण्याचे काम हाती घेतले, याबद्दल महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस प्रशासनाने सहकार्य केले. मात्र, हे काम अर्धवट न सोडता आठ किलोमीटरमधील सर्व ४५ ठिकाणचे खंडित दुभाजक तातडीने बंद करावेत.
राजेंद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बागलाण
------