

Potholes on major roads in Satana raise safety concerns ahead of Ganeshotsav and immersion processions.
Sakal
सटाणा : गणेशोत्सवाला उद्या सोमवार (ता.१४) पासून प्रारंभ होत असून शहरात लाडक्या गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतींच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच सटाणा पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मात्र मोठे विघ्न ठरत आहे. साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानकापासून कंधाणे फाट्यापर्यंत दुतर्फा मोठे खड्डे पडले असून, शहरातील प्रमुख रस्ते तसेच नववसाहतींमधील अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. गणरायाच्या आगमनापासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत शहरातील रस्त्यांवर वाढणारी वर्दळ लक्षात घेता, या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात जनतेकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.