भूमी अभिलेख उपअधीक्षक
सटाण्यात लाच घेताना अटकेत
सकाळ वृत्तसेवा
सटाणा ता.३ : येथील भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकाला पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. देवेंद्र मधुकर भावसार (वय ५१) असे लाच पकडलेल्या उपअधीक्षकाचे नाव असून, सोमवार (ता.२) सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान सटाणा येथीलभूमी अभिलेख कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महेंद्र बाळकिसन भन्साळी (वय ४८, रा. सटाणा) यांच्या मृत वडिलांच्या नावे असलेल्या नेहरू रोड, कोर्ट गल्ली, सटाणा येथील भूमापन क्रमांक ७९९ मधील वडिलोपार्जित घराच्या मिळकतीवर वारसाहक्काने स्वतःचे नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या वारस नोंदीचे काम करून देण्याच्या मोबदल्यात भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक देवेंद्र मधुकर भावसार यांनी तक्रारदाराकडे ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.काल सोमवार (ता.२) सायंकाळी तक्रारदारांनी भूमी अभिलेख कार्यालयात काम पूर्ण झाले आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी संबंधित लोकसेवक भावसार यांनी काम झाल्याचे सांगितले. त्यानंतर कामाच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून पाचशे रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून देवेंद्र भावसार यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विकास शिवाजी लोंढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे तपास करीत आहेत.