(पान ४ ला मेन)
------
सातपुड्यात पोलिसांना गांजाशेतीचे आव्हान
कोट्यवधींच्या कारवाया; तीन महिन्यांत २४ कोटी ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
सुरेश शिरसाठ : सकाळ वृत्तसेवा
वकवाड, ता. १ : शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम, डोंगराळ आदिवासी भागात गांजाशेतीविरोधात सातत्याने कारवाया होत असतानाही बेकायदा लागवड सुरूच आहे. अमली पदार्थांचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि शिक्षेची माहिती देत पोलिसांनी गाव- पाड्यांमध्ये जनजागृती केली. मात्र, ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत विविध कारवायांमध्ये अंदाजे २४ कोटी ७२ लाख रुपयांची गांजाची झाडे जप्त करुन नष्ट करण्यात आल्याने कारवायांचा धाक नेमका कुठे कमी पडतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-----
सातपुड्याच्या दुर्गम वनक्षेत्रात गांजाची लागवडीवर धुळे येथील एलसीबीसह नारकोटिक्स ब्यूरो, स्थानिक पोलिस यंत्रणेनेही आतापर्यंत अनेकदा कारवाया करुन कोट्यवधी रुपयांचा गांजा जप्त केला. मात्र, अद्यापही गांजाची लागवड उघड होत आहे. बीट हवालदार, गुप्तचर यंत्रणा आणि वनविभागाच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. वनक्षेत्रात नियमित गस्त, प्रभावी देखरेख आणि विविध यंत्रणांमधील समन्वय किती सक्षम आहे, याचा आढावा घेण्याची गरज आहे. अवैध लागवडीची माहिती वेळेत मिळवून कारवाई करण्यासाठी यंत्रणांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.
-----
तालुक्याच्या प्रतिमेवर गांजाशेतीचा डाग
गांजाशेतीची वारंवार उघड होणारी प्रकरणे शिरपूर तालुक्याच्या प्रतिमेला धक्का देणारी ठरत आहेत. केवळ पिके नष्ट करणे आणि लागवड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे पुरेसे नाही. या व्यवसायासाठी आर्थिक रसद पुरविणारे, गांजाची खरेदी- विक्री करणारे आणि लागवडीमागील सूत्रधार यांच्यापर्यंत तपास पोहोचणे महत्त्वाचे आहे.
------
पाठबळ कुणाचे?
सांगवी पोलिसांनी नुकताच सात कोटीहून अधिकचा गांजा जप्त करुन जाळल्याने या मोठ्या कारवाईला व्यापक प्रसिद्धी मिळाली असली, तरी त्यानंतरही गांजाची लागवड निर्धास्त होत असल्याचे प्रकरणे पोलिसांच्या कारवाईनंतर उघड झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष लागवड करणाऱ्यांना आर्थिक पाठबळ कोण देते, या व्यवसायात कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत आणि गुंतवणूकदारांपर्यंत तपास का पोहोचत नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
------
कठोर कारवाई हाच उपाय
गांजाशेतीमागील संपूर्ण साखळी उघड करून संबंधितांवर पुराव्यांच्या आधारे कठोर कारवाई झाली, तरच या अवैध व्यवसायाला कायमस्वरूपी आळा बसू शकेल. अन्यथा कोट्यवधींच्या कारवाया सुरू राहतील; मात्र गांजाशेतीचे आव्हान कायम राहील. या आव्हानामुळे गांजा लागवडीचा कलंक तालुक्यातून पुसला जाणार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
-------
तीन महिन्यांतील प्रमुख कारवाया
तारीख------------------ठिकाण----------------रक्कम
१३ ऑगस्ट--------------चिलारे, टिटवापाणी------२४ लाख रुपये
१९ ऑगस्ट--------------जुनापाणी--------------साडेसात लाख रुपये
२६ ऑगस्ट--------------जामाईपाडा------------९३ लाख ५० हजार रुपये
३० सप्टेंबर--------------चिलारे--------------८२ लाख ५० हजार रुपये
२ सप्टेंबर----------------जामण्यापाणी, भोरखेडा, रोहिणी व खंबाळे-----सात कोटी ६८ लाख रुपये
३० सप्टेंबर---------------चिलारे---------------८२ लाख ५० हजार रुपये
१४ व १६ ऑक्टोबर-------फत्तेपूर व मांडणीपाडा----पाच कोटी ७७ लाख रुपये
२५ ऑक्टोबर-------------महादेव दोंदवाडा--------सात कोटी ६७ लाख रुपये
२९ ऑक्टोबर-------------आंबापाणी परिसर-------एक कोटी ५२ लाख ५० हजार रुपये
एकूण रक्कम : अंदाजे २४ कोटी ७२ लाख रुपयेे