निसर्ग पर्यटन
----
NSK26H32769
जळगाव : जिल्ह्यातील वढोदा वनक्षेत्रात आढळून आलेल्या पट्टेदार वाघाचे ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे टिपलेले छायाचित्र.
-----
NSK26H32770
जळगाव : जिल्ह्यातील यावल अभयारण्यात जंगलसफारी उपक्रम सुरु करण्यात आला आहे.. यादरम्यान यावल अभयारण्यात आढळून आलेली नीलगाय. (संग्रहित छायाचित्र)
सातपुडा वनक्षेत्र व पर्यटनाचे महत्त्व
-----------------------------
सातपुडा हा केवळ डोंगरांचा समूह नसून जैवविविधता, जलसुरक्षा, हवामानाचे स्थानिक नियमन आणि ग्रामीण व आदिवासी उपजीविकेशी निगडित असा महत्त्वपूर्ण प्रदेश आहे. नर्मदा, तापी आणि त्यांच्या उपनद्यांच्या खोऱ्यांमुळे मध्य व पश्चिम भारताच्या जलव्यवस्थेत या प्रदेशाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
- राजू नन्नवरे, जळगाव
अलीकडच्या काळात वनपर्यटनाला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक महत्त्व प्राप्त झाले आहे. व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव अभयारण्ये, जैवविविधतेने समृद्ध वनक्षेत्रे, डोंगररांगा आणि नैसर्गिक जलस्रोत यांच्याकडे पर्यटक, संशोधक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी आकर्षित होत आहेत. आज वनपर्यटन ही केवळ निसर्गभ्रमंती किंवा वन्यजीवांचे दर्शन घडविणारी संकल्पना राहिलेली नाही; तर निसर्गशिक्षण, जैवविविधता संवर्धन, स्थानिक संस्कृतीचे जतन, संशोधन आणि शाश्वत रोजगारनिर्मिती यांना चालना देणारे प्रभावी माध्यम म्हणून त्याकडे पाहिले जाते. खानदेशातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे जिल्हे तापी खोरे, सातपुडा आणि अजिंठा-सातमाळा पर्वतरांगांच्या परस्परसंबंधातून तयार झालेल्या भौगोलिक रचनेचा भाग आहेत. काळी कापसाची जमीन, नदीकाठची गाळयुक्त जमीन, डोंगरउतार आणि वनमृदा यांमुळे या प्रदेशाच्या नैसर्गिक रचनेत विविधता आढळते. तोरणमाळ पठार, यावल वन्यजीव अभयारण्य, अनेर डॅम वन्यजीव अभयारण्य, मुक्ताई-भवानी संवर्धन राखीव क्षेत्र, वडोदरा वनक्षेत्र आणि परिसरातील इतर वनपट्टे या व्यापक नैसर्गिक लँडस्केपचे महत्त्वाचे घटक आहेत.
जैव-विविधता : निसर्गाचा अमूल्य ठेवा
सातपुडा परिसरात साग, सालई, मोह, अंजन, कडुलिंब, धावडा, हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन आणि विविध स्थानिक वृक्ष-झुडपांच्या प्रजाती आढळतात. औषधी वनस्पती, गवताळ वनस्पती, वेली आणि परागीभवन करणारे कीटक यांचाही परिसंस्थेत महत्त्वाचा वाटा आहे. या वनस्पती मृदा संवर्धन, जलधारण, कार्बन साठवण, भक्ष्य प्राण्यांना अन्न आणि विविध जीवांना निवारा उपलब्ध करून देतात. या परिसरात वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, चौसिंगा, काळवीट, कोल्हा, लांडगा, ससे आणि इतर लहान सस्तन प्राणी आढळू शकतात. त्याचप्रमाणे सरीसृप, उभयचर, फुलपाखरे, कीटक आणि विविध पक्षीप्रजाती या प्रदेशाच्या जैविक समृद्धीत भर घालतात. तोरणमाळ परिसर हा दुर्मीळ वनघुबड (रान पिंगळा) या संकटग्रस्त पक्ष्याच्या अधिवासासाठी विशेष प्रसिद्ध आहे. नामशेष म्हणून घोषित करण्यात आलेला रानपिंगळा अभ्यासकांना याच परिसरात आढळून आला. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि इतर पक्षी-अभ्यासकांनी या परिसरातील पक्षीवैविध्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. उपलब्ध नोंदींमध्ये २५० हून अधिक पक्षी प्रजातींच्या नोंदी वनविभाग आणि पक्षी अभ्यासकांनी केल्या आहेत.
सातपुड्यातील परिसंस्था महत्त्वाचा दुवा
जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिमेकडे सातपुडा पर्वतरांग, पूर्वेकडे सातमाळा आणि दक्षिणेकडे अजिंठा पर्वतरांगांशी संबंधित वनक्षेत्रे आढळतात. यावल, अनेर आणि गौताळा यांसारखी अभयारण्ये, मुक्ताई-भवानी संवर्धन राखीव क्षेत्र, वडोदरा वनक्षेत्र आणि परिसरातील इतर वनपट्टे या व्यापक परिसंस्थेत आणि पर्यावरणीय रचनेत महत्त्वाची भूमिका बजावतात. यावलच्या दक्षिण-पूर्वेकडे अंबाबरवा अभयारण्य, पूर्वेकडे वन अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्रप्रकल्पाशी संबंधित वनप्रदेश आहेत. पश्चिमेकडे अनेर, तोरणमाळ आणि गुजरातमधील शूलपाणेश्वर असे महत्त्वपूर्ण वनक्षेत्र आहेत ,बोदवड-जामनेर आणि पुढील डोंगराळ वनक्षेत्रांमार्गे गौताळा परिसराशी संभाव्य अधिवास-जोडणीचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे, हा वन्य जीवांचा दुसरा शाश्वत संचार मार्ग आहे. या अनुषंगाने कॅमेरा ट्रॅप, वन्यजीवांच्या हालचालींच्या नोंदी, अधिवास विश्लेषण आणि भौगोलिक माहिती प्रणाली आधारित नकाशांकन वनविभागामार्फत करण्यात येते असते, ज्याप्रमाणे पश्चिम विदर्भामध्ये भारत सरकारच्या वन्यजीव संस्थान (डेहराडून) यांनी विशेष अध्ययन आणि अभ्यास केलेला आहे , त्याप्रमाणे सातपुड्याची पश्चिम क्षेत्र आणि त्यांना जोडणारे विचार मार्ग यांचा अभ्यास आवश्यक आहे. पश्चिम सातपुड्यातील अधिवासांवर अतिक्रमण, अवैध शिकार, अनियंत्रित चराई आणि इतर मानवी हस्तक्षेपांचा परिणाम होत असल्याचे अनेक अहवालांमधून स्पष्ट झालेले आहे.
मुक्ताई-भवानी संवर्धन राखीव क्षेत्र : व्याघ्रसंवर्धनाची महत्त्वपूर्ण संधी
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई-भवानी संवर्धन राखीव क्षेत्र आणि वडोदरा वनपरिक्षेत्र हे पश्चिम सातपुड्यातील वन्यजीव अधिवास व संभाव्य संचारमार्गांच्या अभ्यासात महत्त्वाचे आहेत. वनविभागाच्या आणि स्थानिक अभ्यासकांच्या नोंदींनुसार या परिसरात वाघांच्या अधिवास अढळून आले आहेत, ट्रॅप कॅमेरा मधेही वाघांच्या अधिवासाचे पुरावे आढळले आहेत. या क्षेत्रात असलेल्या केळींच्या बागांमधे वाघांचे अधिवास आणि प्रजनन क्षेत्र असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध झाले आहे . मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्रामध्ये १० ते १२ वाघांचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे. पुढे हे क्षेत्र अंबाबरवा अभयारण्य - नरनाळा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाशी जोडले जाते, हा अत्यंत महत्त्वाचा संचार मार्ग आहे .
या क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ १२२ चौ.कि.मी. आहे आणि त्यात १२ गावांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. चारठाणे, वायला-चिंचखेडा, डोलरखेडा-नांदवेल, सुखळी-दुही, मोरझिरा, राजुरे, जोंधनखेडा आणि वडोदरा या गावांलगतच्या वनक्षेत्रांतून वाघांसह इतर वन्यजीवांचा संचार होत असल्याचे स्थानिक निरीक्षणांतून नमूद करण्यात आले आहे , यातूनच डोलरखेडा परिसराला संभाव्य गाभाक्षेत्र मानण्याची संकल्पना पुढे आली आहे. डोलरखेडा गावातील नागरिकांनी सुमारे २०० एकर शेतजमीन व्याघ्रसंवर्धनासाठी देण्याची तयारी दर्शविली आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये तत्कालीन वनविभागीय सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी या क्षेत्राला भेट दिली आणि मे २०१४ मध्ये शासनाने मुक्ताई-भवानी संवर्धन क्षेत्र घोषित करण्यात आले,
यावल वन्यजीव अभयारण्य - केंद्रबिंदू
३ जानेवारी आणि ६ जानेवारी २०१६ रोजी यावल अभयारण्यात ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये वाघ आढळल्याची नोंद संवर्धनाच्या दृष्टीने उत्साहवर्धक मानली गेली. त्यानंतरही अनेक नोंदी वनविभाग आणि वन्यजीव अभ्यासकांनी या क्षेत्रात केलेल्या आहेत. वाघांचे सातत्यपूर्ण अस्तित्व, स्थलांतराची दिशा आणि इतर वनक्षेत्रांशी संबंध निश्चित करण्यासाठी दीर्घकालीन कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षण आणि इतर संशोधन यांच्या मार्फत करण्याची आवश्यकता आहे.
मेळघाट -मुक्ताई भवानी- यावल : शाश्वत संचार मार्ग
मेळघाट व्याघ्रप्रकल्प हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रांपैकी एक आहे. गाविलगड डोंगररांगेतील दऱ्या, डोंगर, पानझडी वने आणि जलप्रणाली यांमुळे येथे विविध प्रकारचे अधिवास निर्माण झाले आहेत. मुक्ताई-भवानी, वडोदरा आणि यावल परिसरातील वनपट्टे मेळघाट व पश्चिम सातपुड्यातील अधिवासांशी कशा प्रकारे जोडलेले आहेत, याचा अभ्यास झालेला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांकडून अधिक व्यापक शास्त्रीय अभ्यास करणे गरजेचे आहे.
निसर्ग पर्यटनाच्या संधी
धुळे जिल्ह्यातील अनेर डॅम वन्यजीव अभयारण्य हे पश्चिम सातपुड्यातील महत्त्वाचे वनक्षेत्र आहे. येथील जंगल, डोंगराळ भूभाग, गवताळ पट्टे आणि जलस्रोत यांचा एकत्रित विचार करून पर्यावरणशिक्षण, पक्षीनिरीक्षण, स्थानिक वनस्पतींची ओळख आणि जलस्रोत संवर्धनाशी संबंधित उपक्रम आखता येऊ शकतात.
तोरणमाळ हे महत्त्वाचे पठारी क्षेत्र असून डोंगररांगा, वनक्षेत्र, स्थानिक आदिवासी संस्कृती आणि जैवविविधता यांमुळे ते निसर्गपर्यटनासाठी आकर्षक ठरू शकते. वनघुबडासारख्या दुर्मीळ पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण, पक्षीनिरीक्षण, स्थानिक वनस्पतींची ओळख, पारंपरिक पर्यावरणीय ज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटी या उपक्रमांना प्राधान्य देता येईल.
वनपर्यटनातून रोजगार निर्मिती
खानदेशात पर्यावरणपूरक पर्यटनाचे स्वरूप स्थानिक परिसंस्थेच्या क्षमतेनुसार निश्चित करणे आवश्यक आहे. पर्यटनाचा उद्देश केवळ पर्यटकांची संख्या वाढविणे नसून निसर्गाचे संरक्षण, पर्यावरणशिक्षण आणि स्थानिक समुदायांना न्याय्य आर्थिक लाभ मिळवून देणे हा असावा.
१. निसर्गभ्रमंती आणि पक्षीनिरीक्षण : निर्धारित मार्गांवर प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शकांसह भ्रमंती, पक्ष्यांचे निरीक्षण, वनस्पती ओळख आणि जैवविविधता नोंदविणे.
२. आदिवासी संस्कृती आणि समुदायाधारित पर्यटन : स्थानिक खाद्यसंस्कृती, लोककला, होळीचे उत्सव, पारंपरिक ज्ञान, हस्तकला आणि गावजीवनाचा परिचय करून देणारे ग्रामसभा व समुदायांच्या सहभागातून चालणारे उपक्रम.
३. निसर्गशिक्षण आणि संशोधन पर्यटन : शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधकांसाठी जैवविविधता अभ्यास, वनस्पती सर्वेक्षण, जलस्रोत अभ्यास, वन्यजीव निरीक्षण आणि क्षेत्रीय प्रशिक्षण.
४. स्थानिक उत्पादनांवर आधारित उपजीविका : स्थानिक खाद्यपदार्थ, रानभाजी महोत्सव, हस्तकला, मार्गदर्शक सेवा आणि कायदेशीररीत्या संकलित व शाश्वत पद्धतीने उत्पादित लघुवनोपज यांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती.
सातपुड्याचे वनक्षेत्राची जोपासना म्हणजे वाघांचे आणि इतर वन्यजीवांचे अस्तित्व जपणे; वन्यजीवांचे अस्तित्व जपणे म्हणजे परिसंस्थेचे आरोग्य जपणे; आणि परिसंस्था जपणे म्हणजे भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षा, जैवविविधता आणि शाश्वत विकासाचा पाया मजबूत करणे होय. म्हणूनच खानदेशातील वनपर्यटनाचा विकास हा केवळ पर्यटनाचा विषय नसून निसर्गसंवर्धन, सामाजिक न्याय आणि स्थानिक विकास यांना जोडणारी दीर्घकालीन चळवळ ठरू शकतो. सातपुडा समृद्ध झाला, तर खानदेशाचे पर्यावरणीय भविष्य अधिक सुरक्षित आणि समृद्ध होईल.
(लेखक पर्यावरण अभ्यासक तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत.)