सातपूरच्या नऊ कंपन्यांमधील कामगारांची दिवाळी गोड
२६ ते ८० हजारांचा बोनस; वर्कर्स युनियनच्या पाठपुराव्याला यश
सकाळ वृत्तसेवा
सातपूर, ता. २८ : औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सीटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे औद्योगिक वसाहतीतील नऊ कंपन्यांमध्ये बोनसचे यशस्वी करार झाले आहेत. या करारानुसार संबंधित कंपन्यांतील युनियनच्या सभासद कामगारांना २६ हजार रुपयांपासून ते तब्बल ८० हजार रुपयांपर्यंत बोनस मिळणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सणासुदीच्या काळात त्यांच्या आनंदात भर पडली आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमध्ये कामगारांच्या बोनससंदर्भात झालेल्या चर्चेनंतर सकारात्मक तोडगा निघाला. यामध्ये इंडियन वॉल्व्ह प्रायव्हेट लिमिटेड, सोमेश फोर्जिंग, आनंद आय पावर, टीडीके (इप्कॉस), गोल्डी प्रेसिजन स्टॅम्पिंग, सिप्रा इंजिनिअरिंग युनिट-१, शेरीन ऑटो, चैतन्य फार्मास्युटिकल आणि ऑर्बिटल सिस्टम बॉम्बे या नऊ कंपन्यांचा समावेश आहे.
या बोनस करारांसाठी झालेल्या चर्चेत सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, नाशिक जिल्हा सीटूचे अध्यक्ष सीताराम ठोंबरे, सीटूचे सेक्रेटरी संतोष काकडे आणि युनियनचे सेक्रेटरी सतीश खैरनार यांनी सहभाग घेतला. त्यांनी चर्चेदरम्यान योग्य मध्यस्थी करत कामगारांच्या बोनससंदर्भातील मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने नऊ कंपन्यांमधील बोनस करार मार्गी लागले. कामगारांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत झालेल्या या करारांमुळे सातपूर औद्योगिक वसाहतीतील संबंधित कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. बोनसच्या रूपाने हातात येणाऱ्या रकमेचा फायदा कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणार असून, कामगारवर्गात समाधानाचे वातावरण आहे.
-- चौकट
कोणत्या कंपनीत किती बोनस?
इंडियन वॉल्व्ह प्रायव्हेट लिमिटेड : ३५ ते ४०, ००० रुपये
सोमेश फोर्जिंग प्रा. लि. : ३८, ते ४२, ००० रुपये
आनंद आय पावर लि. : ३६,००० रुपये
टीडीके (इप्कॉस) : ५० ते ८०,००० रुपये
गोल्डी प्रेसिजन स्टॅम्पिंग प्रा. लि. : २६,००० रुपये
सिप्रा इंजिनिअरिंग प्रा. लि., युनिट १ : २८, ते ३६,००० रुपये
शेरीन ऑटो लि. : २६,००० रुपये
चैतन्य फार्मास्युटिकल प्रा. लि. : ३१ ते ३८,००० रुपये
ऑर्बिटल सिस्टम बॉम्बे प्रा. लि. : ३४ ते ५२,००० रुपये