फोटो : H35158
सातपूरमध्येही ‘विषारी क्रोमियम’चा शिरकाव
थेट भूगर्भात सोडले जातेय पिवळे रासायनिक सांडपाणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : अंबडनंतर आता सातपूर एमआयडीसीतही अत्यंत घातक ‘हेक्झाव्हॅलेंट क्रोमियम’युक्त पिवळे रासायनिक सांडपाणी थेट जमिनीत आणि नैसर्गिक नाल्यालगत सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा धोका अधिकच गडद झाला आहे.
सातपूर औद्योगिक परिसरातील प्लॉट क्रमांक एसएस-५१ येथील एका युनिटमधून नैसर्गिक नाल्यालगत खोदलेल्या कच्च्या खड्ड्यात पाइपाद्वारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात होते. मान्यताप्राप्त प्रयोगशाळेच्या १४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या तपासणी अहवालानुसार, या पाण्यात अत्यंत विषारी मानले जाणारे हेक्झाव्हॅलेंट क्रोमियम १.१६ एमजी वन इतक्या मोठ्या प्रमाणात आढळले आहे. याशिवाय या नमुन्यात तीव्र आम्लता आणि शिसे, कॅडमियम, आर्सेनिक, पारा, अँटिमनी व सेलेनियम यांसारखे अतिविषारी जड धातूही आढळून आले आहेत.
सातपूरमधील हे नैसर्गिक नाले पुढे रामतीर्थाच्या वरच्या बाजूला जाऊन थेट गोदावरी नदीपात्रात मिळतात. त्यामुळे हे विषारी घटक भूगर्भात झिरपून थेट गोदावरी नदीपात्रात पोहोचण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी भाविकांचे आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी पर्यावरणप्रेमी रोशन केदार आणि प्रवीण शिलावट यांनी केली आहे.
प्रशासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्या
-नियमांचे उल्लंघन करून जमिनीत व नाल्यांमध्ये रसायने सोडणारे प्लेटिंग उद्योग तत्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
-परिसरातील सर्व नैसर्गिक नाल्यांच्या पाण्याचे नमुने घेऊन त्यांची जड धातूंसाठी प्रयोगशाळेत तपासणी करावी.
-गोदावरीच्या पाण्यात घातक रसायने नसल्याची खात्री होईपर्यंत नागरिकांनी आणि भाविकांनी नदीच्या पाण्यात उतरू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने तत्काळ जारी कराव्यात.