फोटो : B10674
सातपूर : जलवाहिनी फुटल्याने उडणारे उंच फवारे.
--
श्रमिकनगरमध्ये खोदकाम
करताना जलवाहिनी फुटली
सातपूर, ता. ११ : श्रमिकनगर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पायथ्याशी शनिवारी (ता. १०) सायंकाळी पाचच्या दरम्यान जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असताना मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय झाला असून स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
श्रमिकनगरनगर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पायथ्याशी विविध विकासकामांसाठी खोदकाम सुरू आहे. काम सुरू असताना जमिनीखाली असलेल्या मुख्य जलवाहिनीला जेसीबीचा जोरात धक्का बसला आणि ती जागीच फुटली. जलवाहिनी फुटताच पाण्याचे दहा ते पंधरा फूट उंच प्रचंड फवारे उडत होते आणि काही तासांतच संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी साचले, यामुळे परिसराला जणू नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या घटनेचा थेट फटका परिसरातील पाणीपुरवठ्याला बसला आहे. श्रमिकनगर येथील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. एकीकडे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तर दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे. सातपूर परिसरातील अशोकनगर, श्रमिकनगर, छत्रपती शिवाजीनगर या परिसरात पाच ते सहा ठिकाणी ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीपुरवठा अधिकारी याकडे लक्ष तर कधी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच ठिकाणी खोदकामादरम्यान जेसीबीमुळे १३ एप्रिलला सायंकाळी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली होती. पुन्हा त्या ठिकाणी जेसीबीमुळे जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती देण्यासाठी नागरिकांनी अधिकाऱ्यांना फोन केला असता, अधिकाऱ्यांनी उचलले नाही.