वाहनांच्या काचा
फोडत तलवारीने हल्ला
सातपूर, ता. ११ : मळे परिसरात नंदिनी पुलाजवळील साई पार्क येथे शनिवारी (ता. १०) रात्री साडेअकराच्या सुमारास पाच तरुणांनी दोन दुचाकींवरून येत धुडगूस घातला. या तरुणांनी स्कूल व्हॅनसह अन्य वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनमालकावर तलवारीने हल्ला करण्याचाही प्रयत्न केल्याची घटना घडली.
रो हाऊस क्रमांक १३, साई पार्क, नंदिनी पूल परिसरात दुचाकींवरून पाच अज्ञात तरुण आले. त्यांनी परिसरात गोंधळ घालत वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. फिर्यादीने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांपैकी एकाने त्यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. मात्र, फिर्यादी यांनी हल्ला चुकविल्याने ते घरात पळून गेले. यानंतर संशयितांनी फिर्यादी यांच्या मालकीच्या स्कूल व्हॅनची (एमएच- १५- एफई- ५४०४) काच फोडली. तसेच शेजारी दीपक वाघ यांच्या स्कॉर्पिओ (एमएच १५ एएफ ०१००) या वाहनाची काच फोडून नुकसान केले. याशिवाय पेट्रोल टाकून वाहनांना आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात पाच अज्ञात संशयितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.