फोटो : H31862
नाशिक : ‘मविप्र’चा माजी विद्यार्थी आणि भारताचा उंच उडीपटू सर्वेश कुशारे याचा सत्कार करताना मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आणि सभापती बाळासाहेब क्षीरसागर. समवेत सर्वेशचे वडील अनिल कुशारे, आई सुलोचना कुशारे पत्नी रोहिणी कुशारे आदी.
--------
सर्वेश कुशारेच्या यशामुळे तरुणांना प्रेरणा
ॲड. नितीन ठाकरे : ‘मविप्र’कडून सन्मान सोहळा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : आशियाई क्रीडा स्पर्धेत उंचउडी क्रीडा प्रकारात रौप्यपदकाची कमाई करणारा मविप्र संस्थेचा माजी विद्यार्थी सर्वेश कुशारे याचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. सर्वेशने आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून देशासह देवगावचे नाव उज्ज्वल केले असून, त्याच्या यशामुळे क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आहे, असे गौरवोद्गार मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी काढले.
मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आणि सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते देवगाव येथे सर्वेश कुशारे याच्या निवासस्थानी त्याचा सन्मान करण्यात आला. या वेळी त्याचे वडील अनिल कुशारे, आई सुलोचना आणि पत्नी रोहिणी यांचाही गौरव केला. ग्रामस्थ, संस्था सभासद उपस्थित होते. ॲड. नितीन ठाकरे म्हणाले, सर्वेशने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. मविप्रचा माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवतो, ही संस्थेसाठी आनंदाची, अभिमानाची बाब आहे. खेळाडूंच्या गुणवत्तेला योग्य संधी, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते जागतिक स्तरावर निश्चितच आपला ठसा उमटवू शकतात. सभापती क्षीरसागर म्हणाले, की सर्वेशच्या यशामागे त्याची कठोर मेहनत, शिस्त, जिद्द आणि कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे. खेळामध्ये यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण सरावाबरोबरच कुटुंबाचा पाठिंबा आणि समाजाचे प्रोत्साहन महत्त्वाचे असते. सत्काराप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, गजीराम खुळे, अनिल बोचरे, नामदेव बोचरे, दत्तात्रेय बोचरे, सचिन बोचरे, अरुण गावडे आदी उपस्थित होते.