स्कूल बसचालकाकडून
युवकाला बेदम मारहाण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : भरधाव बस चालवणाऱ्या एका शाळेच्या बसचालकाला ‘गाडी जरा हळू चालव’ असे सांगणे एका खाजगी नोकरदाराला चांगलेच महागात पडले असून, संतापलेल्या बसचालकाने या तरुणावर लोखंडी टामीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
गोरख नागू आहिरे (२६, रा. पिंगळे गल्ली, मखमलाबाद) यांच्या फिर्यादीनुसार, १३ ऑक्टोबरला ते सकाळी सातच्या सुमारास ते मोपेडने (एमएच १५ एलसी ८२२१) गोदरेज कंपनीत कामासाठी निघाले होते. ते मखमलाबाद येथील इरिगेशन कॉलनीतील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ आले असता, समोरून एक शालेय बसचालक अत्यंत भरधाव आणि अविचाराने चालवत होता. त्यावरून फिर्यादी आहिरे यांनी त्या बसचालकाला गाडी थोडी हळू चालवण्याची विनंती केली. याचा राग आल्याने बसचालकाने आपली बस रस्त्यातच थांबवली. तो खाली उतरला आणि त्याने अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तू मला सांगणारा कोण? असे म्हणत त्याने आपल्या जवळील लोखंडी टामी काढून आहिरेच्या डोक्यात, तोंडावर, डोळ्याजवळ आणि पाठीवर बेदम मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात गर्दी जमू लागल्याचे पाहून संशयित बसचालकाने काढता पाय घेत पसार झाला. हल्ल्यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने आहिरे यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. म्हसरूळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.